अखर्चित निधीची जुळवाजुळव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 09:34 PM2017-12-21T21:34:01+5:302017-12-21T21:34:28+5:30
जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने सर्व विभागांच्या अखर्चित निधीची जुळवाजुळव सुरू केली आहे. प्रत्येक विभागाकडून जमा-खर्चाचा हिशेब मागण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाने सर्व विभागांच्या अखर्चित निधीची जुळवाजुळव सुरू केली आहे. प्रत्येक विभागाकडून जमा-खर्चाचा हिशेब मागण्यात आला आहे.
शासनाकडून दरवर्षी विविध विभागांना निधी दिला जातो. हा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करणे आवश्यक असते. मात्र जिल्हा परिषदेतील लेटलतीफीमुळे हा निधी बरेचदा पडून राहातो. महिनोगणती त्याला हातच लावला जात नाही. मात्र मार्च महिना जवळ येताच सर्वच विभागांना निधीची आठवण होते. हा निधी खर्ची घालण्यासाठी विभाग आणि त्यांच्या प्रमुखांची धावपळ सुरू होते. प्रत्यक्षात केवळ तीन महिन्यात निधी खर्ची घालणे अवघड होते. यातून वाचण्यासाठी अधिकारी विविध फंडे वापरून आपल्यावर निधी वापरला नाही म्हणून बालंट येऊ, याची दक्षता घेण्यासाठी धावपळ करतात.
वित्त विभागाने जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांना आता निधीचा लेखाजोखा मागितला आहे. कोणता निधी मिळाला, किती निधी मिळाला, त्यातून कोणत्या योजनांवर किती खर्च झाला, सध्या किती निधी शिल्लक आहे, याचा लेखाजोखाच वित्त विभागाने मागितला आहे. त्यामुळे सर्व विभागात निधीची जुळवाजुळव सुरू झाली आहे. काही विभागांची आकडेमोड ताळमेळ खात नाही. त्यामुळे निधीच्या आकड्यांचा ताळमेळ जुळविण्यात संबंधित विभागातील लेखापालांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकदाची जुळवाजुळव झाली की, वित्त विभागाला सर्व विभाग निधीचा लेखाजोखा सादर करणार आहे.
निधी जाणार परत
विविध विभागांकडे अखर्चित असलेल्या निधीपैकी काही निधी शासन जमा होणार आहे. राज्य शासनाने वित्त विभागाला पत्र देऊन अखर्चित निधीचा हिशेब मागितला आहे. वित्त विभागाकडे हिशेब सादर होताच, त्यापैकी काही निधी त्वरेने शासन परत घेणार आहे. केवळ अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे हा निधी आता शासन जमा होण्याची शक्यता आहे. तो आत्तापर्यंत संबंधित कामांवर खर्ची घातला असता, तर निधी परत जाण्याची वेळ ओढवली नसती, एवढे निश्चित.