प्रसूती वॉर्डात खाटा ३० आणि रुग्ण ७०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 10:11 PM2018-04-19T22:11:19+5:302018-04-19T22:11:19+5:30
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री व बालरोग विभागात रुग्णांची प्रचंड गर्दी झाली आहे. येथील प्रसूती वॉर्डात ३० खाटा असून एकाच वेळी ७० च्यावर महिला प्रसूतीसाठी दाखल होतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री व बालरोग विभागात रुग्णांची प्रचंड गर्दी झाली आहे. येथील प्रसूती वॉर्डात ३० खाटा असून एकाच वेळी ७० च्यावर महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. अशा स्थितीत उपचार कसा करायाचा हा प्रश्न निर्माण होतो. अनेकदा स्ट्रेचरवर झोपवून सलाईन लावावे लागते. डॉक्टरांची अनेक पदे या विभागात रिक्त आहेत. त्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची गैरसोय होते.
‘मेडिकल’च्या प्रसूती विभागात वर्षभरात ९ हजार महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. ही संख्या दररोज वाढतच आहे. साधने व वॉर्डातील बेडची संख्या मात्र कमी पडत आहे. मंजूर डॉक्टरांची पदेही रिक्तच आहेत. त्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण येथील यंत्रणेला सोसावा लागत आहे. येथे आलेल्या महिलांना परत पाठविणे शक्य नसते. उपलब्ध स्थितीतच प्रसूती केली जाते. अशीच स्थिती बालरोग विभागाची आहे. येथील साधने अपुरी पडत आहेत. एनआसीयू आणि एमआयसीयूमध्ये बालकांची गर्दी झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी रुग्णालय प्रशासनाची धडपड सुरू आहे. जुन्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीत दोन्ही वॉर्ड स्थानांतरित करून तेथे स्वतंत्र कक्ष तयार केले जाणार आहे.
यासाठी अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी इमारतीच्या डागडुजीसाठी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला आहे. पाण्याची कमतरता असल्याने हे काम सध्या पूर्ण करणे शक्य नाही. काही दिवस तरी येथील उपलब्ध स्थितीतच दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे डॉ. श्रीगिरीवार यांनी सांगितले.
रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहे. रुग्णालयात प्रत्येक डॉक्टरांच्या कामाचे आॅडीट केले जात आहे. कोण किती शस्त्रक्रिया करतो, याचीही नोंद घेत आहे. रुग्णसेवा व शैक्षणिक कर्तव्यातील कसूर खपवून घेतला जाणार नाही.
- डॉ. मनीष श्रीगिरीवार
अधिष्ठाता, वसंराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय .