गणिताच्या विद्यार्थ्यांना ‘सायन्स’ला प्रवेश नाही
By admin | Published: May 20, 2017 02:30 AM2017-05-20T02:30:18+5:302017-05-20T02:30:18+5:30
गेल्या दोन शैक्षणिक सत्रांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीला सामान्य गणित विषय घेतला होता, त्यांना आता विज्ञान शाखेत
अकरावी, बारावी प्रवेश : मूळ गुणपत्रिका जोडल्यावरच स्वीकारणार अर्ज
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या दोन शैक्षणिक सत्रांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीला सामान्य गणित विषय घेतला होता, त्यांना आता विज्ञान शाखेत कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही, असा आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने जारी केला आहे. विशेष म्हणजे, सध्या अकरावीची परीक्षा दिलेल्या अशा विद्यार्थ्यांना बारावीची अॅडमिशन करतानाही अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
इतर विषयात गती असताना केवळ गणित कठीण जाणाऱ्या विद्यार्थ्यांची दहावीत अडचण होऊ नये म्हणून बिजगणिताऐवजी ‘सामान्य गणित’ हा पर्याय निर्माण करण्यात आला. जिल्ह्यात शेकडो विद्यार्थ्यांनी दहावीला सामान्य गणितच घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु, सामान्य गणिताच्या आधारे दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश दिला जाणार नाही.
२०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन शैक्षणिक सत्रात ज्या विद्यार्थ्यांनी सामान्य गणित घेतले होते, त्यांना विज्ञान शाखेत प्रवेश देऊ नये, असे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे सध्या दहावीची परीक्षा दिलेल्या सामान्य गणिताच्या विद्यार्थ्यांना कला किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याशिवाय पर्याय नाही. तसेच २०१५-१६ या सत्रात ज्यांनी सामान्य गणितासह दहावी उत्तीर्ण केली, त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी २०१६-१७ मध्ये अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे. परंतु, आता २०१५-१६ मधील सामान्य गणिताच्या विद्यार्थ्यांनाही विज्ञान शाखेत प्रवेश न देण्याच्या सूचना आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा बारावी विज्ञान प्रवेश कठीण होणार आहे.
२३ महाविद्यालयांना नोटीस
विशेष म्हणजे, यावर्षी बारावी विज्ञानची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा मंडळाने पडताळणी केली असता, अनेक विद्यार्थ्यांनी दहावीला सामान्य गणित घेतल्याचे निष्पन्न झाले. अशा विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांना मंडळाने नोटीसाही बजावल्या. दहावीला सामान्य गणित असताना अकरावी-बारावीला विज्ञान शाखा घेता येत नाही, असा नियम आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील २३ महाविद्यालयांना नोटीस आल्या. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच शिक्षण विभाग जागा झाला. हा प्रकार पुढे होऊ नये म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांनी विज्ञान शाखेच्या प्रवेशावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. प्रवेशाच्या वेळी मूळ गुणपत्रिका जोडल्याशिवाय पुढील कार्यवाहीच न करण्याच्या सूचना आहेत.