यवतमाळात गादी कारखान्याला आग; लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 11:25 AM2020-05-23T11:25:58+5:302020-05-23T11:26:31+5:30
स्थानिक आर्णी रोडवरील पुष्पकुंज सोसायटीत शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास शॉटसर्किटने गादी कारखान्याला भीषण आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक आर्णी रोडवरील पुष्पकुंज सोसायटीत शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास शॉटसर्किटने गादी कारखान्याला भीषण आग लागली. यावेळी शेजारील पाणीपुरीवाल्याकडे असलेले तीन गॅस सिलिंडर फुटल्याने आग आणखीनच वाढली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
पुष्पकुंज सोसायटीत नाल्याच्या काठावर शेख यांचा हा गादी कारखाना आहे. त्यांच्या विद्युत मीटरनजीक असलेल्या बोर्डात स्पार्किंग झाले. त्यातूनच ही आग लागली. आगीमध्ये साडेतीन लाख रुपये किंमतीची मशीन, २४ गाद्या, रुई, कापड, दुकान व साहित्य जळून खाक झाले. यात दुकान मालकाचे लाखोंचे नुकसान झाले. याच कारखान्याला लागून गुर्जर यांचे कच्चे घर आहे. तेथे पाणीपुरी विकणारे भाड्याने राहतात. या घरालाही आग लागली. यावेळी घरात असलेल्या महिला व मुलांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. या आगीत सिलिंडरचा स्फोट झाला. आगीची माहिती मिळताच यवतमाळ नगरपरिषदेच्या अग्नीशमन विभागाचे दोन बंब दाखल झाले. परंतु त्यापैकी एकात पाणीच नसल्याने या बंबला ऐनवेळी पाणी भरण्यासाठी जावे लागले. गादी कारखान्याच्या बाजूने असलेल्या अक्वा व अन्य दुकानांनाही आगीचा फटका बसला.