‘मौला तेरी मिल जाये पनाह...’
By admin | Published: March 26, 2016 02:17 AM2016-03-26T02:17:28+5:302016-03-26T02:17:28+5:30
पुनवेच्या चंद्राने आकाश व्यापलेले. त्या पूर्णचंद्राचे मोहक बिंब प्रेरणास्थळावरील जलाशयाने सामावून घेतलेले.
सूफी संगीताने रसिक मंत्रमुग्ध : ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिदिनी पूजा गायतोंडे यांची स्वरांजली
यवतमाळ : पुनवेच्या चंद्राने आकाश व्यापलेले. त्या पूर्णचंद्राचे मोहक बिंब प्रेरणास्थळावरील जलाशयाने सामावून घेतलेले. होळी पौर्णिमेच्या अशा रम्य वातावरणात सुफी संगीताची अनोखी मैफल यवतमाळच्या रसिकांना रिझवून गेली. ‘‘अज कोई जोगी आवे’’ अशा सुरांनी कानसेनांचे स्वागत झाले, तर ‘‘मौला तेरी मिल जाये पनाह’’सारख्या सुफी रचनांतून ईश्वराची करुणा भाकण्यात आली.
लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त पूजा गायतोंडे यांच्या गायनाची बहारदार मैफल झाली. बुधवारी रात्री प्रेरणास्थळावर या कार्यक्रमासाठी शेकडो रसिकांनी झुंबड केली होती. सुरवातीला लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, ज्योत्स्नाभाभी यांच्या ज्येष्ठ भगिनी सुशिलाबेन बंब, निर्मलाजी बाफना, उमाजी मोदी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. माजी आमदार कीर्ती गांधी, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा आदी उपस्थित होते.
सुफी संगीत म्हणजे देवाच्या आराधनेचाच एक मार्ग. सुफी गायन यवतमाळात तसे दुर्मिळच. त्यामुळेच पूजा गायतोंडे यांची मैफल यवतमाळ-करांसाठी संस्मरणीय ठरली. ‘‘बिस्मिल्लाह... मौला तेरी मिलजाये पनाह’’ या रचनेने पूजाने सुरुवात केली अन् रसिक सुफी स्वरांच्या मोहातच पडले. सुफी रचनांमध्ये ‘मौला अली मौला’, ‘मेरे तन मन मे अली अली’ अशी वारंवार येणारी पदे रसिकांना डोलायला भाग पाडत होती.
‘‘ख्वाजा मेरे ख्वाजा
दिल मे समा जा
शाहो का शाह तू
अली का दुलारा’’
हा सुपरिचित सुफी कलाम पूजाच्या गळ्यातून ऐकताना श्रोते भान हरपून गेले. मीराबाईची रचनाही आगळी वेगळी ठरली.
‘‘सासो की माला पे
सीमरू मै पी का नाम
अपने मन की मै जानू
पी के मन की राम...’’
ईश्वरावर प्रेम करीत त्याच्याशी तादात्म्य पावण्याची भावना मीराबाईच्या शब्दांतून प्रगटली. त्याला पूजा गायतोंडेंच्या स्वरांचे कोंदण लाभले. ‘सासो की माला पे’ हे पद आळविताना पूजाच्या स्वरातली लचक मनावर गारुड करणारी होती. एका क्षणाला तार सप्तकात टीपेला जाणारा पूजाचा स्वर दुसऱ्याच क्षणाला मंद्र सप्तकातही तितक्याच हळूवारपणे पोहोचायचा. भारदस्त आवाजातील आलाप, द्रुत लयीतील सरगम अशी नजाकत सादर करीत पूजाने रसिकांना दोन तास खिळवून ठेवले.
‘‘रांझा जोगिया बन आया
अहदो अहमद नाम रखाया
नी अज कोई जोगी आवे
मैनू छडिया रुपदा से
प्यार दी बिन सुना जावे’’
ही पंजाबी सुफी रचना विशेष दाद मिळवून गेली. या उडत्या चालीवर श्रोत्यांची पावले जागच्या जागीच थरकू लागली. रसिकांच्या खास फर्माईशचा आदर ठेवत पूजाने गझल सादर केल्या.
‘‘रंजीशी सही
दिलही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे
छोड के जाने के लिए आ’’
‘‘हाय मर जायेंगे हम तो लुट जायेंगे
ऐसी बाते किया ना करो
आज जाने की जिद ना करो
युही पहलू मे बैठे रहो...’’
या गझलांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. ‘‘वक्त की कैद मे जिंदगी हैं मगर.. चंद घडियाही हैं जो आझाद हैं..’ हा शेर वातावरण भावूक करून गेला. पूजा गायतोंडे यांच्या मैफलीत प्रसाद गायतोंडे (तबला), संचित म्हात्रे (परकशन), मोहम्मद शादाब (ढोलक), अक्षय आचार्य (किबोर्ड), युसूफ दरबार (बेंजो) या वाद्यवृंदांनी साथसंगत केली. तर राहुल चिटणीस, जनार्दन धात्रक, नितीन करंदीकर यांनी कोरस गायन केले.
यावेळी लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते गायिका पूजा गायतोंडे, तिचे वडील चरण गायतोंडे, वाद्यवृंदांचा सत्कार करण्यात आला. संचालन अॅड. प्रवीण जानी यांनी केले. आभार लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)