अपंगत्वावर मात करून एमबीबीएसचा ध्यास

By Admin | Published: May 27, 2016 02:13 AM2016-05-27T02:13:29+5:302016-05-27T02:13:29+5:30

ती लहानपणापासूनच हुशार आणि तल्लख बुद्धिची. प्रचंड इच्छाशक्ती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत असताना बालवयातच अपघातामुळे अपंगत्व आले.

MBBS Beats by Overcoming Disability | अपंगत्वावर मात करून एमबीबीएसचा ध्यास

अपंगत्वावर मात करून एमबीबीएसचा ध्यास

googlenewsNext

संघर्ष यात्रा : माधवी सामृतवारचा धाडसी निर्णय, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये घेतेय दुसऱ्या वर्षात प्रशिक्षण
नरेश मानकर पांढरकवडा
ती लहानपणापासूनच हुशार आणि तल्लख बुद्धिची. प्रचंड इच्छाशक्ती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत असताना बालवयातच अपघातामुळे अपंगत्व आले. मात्र तरीही न डगमगता तिने स्पर्धेच्या युगात मुंबई येथील जे.जे.हॉस्पीटल व वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस.साठी प्रवेश घेतला. डॉक्टर होण्याचे स्वप्न साकारताना तिला करावा लागणारा संघर्ष, वाखाणन्याजोगा ठरला.
माधवी मोहन सामृतवार, असे या धाडसी युवतीचे नाव आहे. ती तालुक्यातील सुसरी या लहानशा खेडेगावातील मुलगी. अवघ्या पाच वर्षाचे वय असताना केळापूर येथील जगदंबा मातेच्या नवरात्रोत्सव ती यात्रेला आई-बाबासोबत आली होती. खेळण्या बागडण्याचे वय होते. रस्त्याने चालताना कुणाला काही कळायच्या आतच एका ट्रकने तिला धडक दिली. तिच्या पायावरून ट्रकचे चाक केले. रक्ताच्या थारोळ्यात ती बेशुद्ध पडली. केवळ नशीब बलवत्तर, म्हणूनच या चिमुकलीचा जीव वाचला. मात्र दवाखान्यात उपचाराअंती तिचा एकपाय कापावा लागला. त्यामुळे अख्खे कुटुंब दु:खात बुडाले. माधवीच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. तिचे वडील शेतकरी. शेतात सतत नापिकी. शेती कसताना त्यांच्याही जीवनाची माती झाली. अपंग मुलीच्या भविष्याची मोठी समस्या त्यांच्या खांद्यावर येऊन पडली. चिमुकल्या माधवीचे आयु्ष्यच उध्वस्त झाले. तथापि या लहानशा जीवाने धीर सोडला नाही. उलट लहान वयातच तिने आपल्या आई-वडिलांनाच धीर दिला. जीवनात रडायचे नाही, काही करून दाखवायच, असे तिने मनोमन ठरविले. शिक्षणाची जीद्द तिच्यात होतीच. सुसरी हे लहानशे खेडे गाव. या गावातच तिचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी आपल्या अपंग मुलीला कुठे पाठवायचे, असा प्रश्न तिच्या पालकांपुढे होता. मात्र हा प्रश्नही अखेर सुटला. आपल्या नातलगाकडे राहून मादवीने येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तिची बुद्धिमत्ता आणि जिद्द बघून अशोक गौरकार या उपक्रमशील शिक्षकाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी माधवीला वेळोवेळी प्रोत्साहन देऊन सहकार्य केले.
माधवी दहावीत शिकत असताना त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय लातूरची चमू वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासंदर्भात माहिती देण्यासाठी या विद्यालयात आली. माधवीचे शिक्षक अशोकगौरकार यांनी त्यांना माधवी अपंग असूनसुद्धा गरीब परिस्थितीशी सामना करीत, कशी शिक्षण घेत आहे, डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न आहे. तुमच्या लातूरच्या संस्थेत तिला काही सोयी, सवलती देऊन अकरावी व बारावी तसेच पी.एम.टी.कोर्सची मदत केल्यास तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होईल, अशी विनंती केली. त्या चमूतील प्राध्यापकांनी त्यांना माधवीने दहावीत ९० टक्क्यांपेक्षा जादा गुण घेतल्यास तिच्या पुढील शिक्षणाकरीता सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्याचवेळी कोणत्याही परिस्थितीत एम.बी.बी.एस. करून डॉक्टर बणन्याचे स्वप्न उराशी बाळगून माधवीने जिद्दीने अभ्यास केला आणि दहावीत ९४.३६ टक्के गुण घेऊन ती प्रावीण्यासह उत्तीर्ण झाली. अपंगत्वावर मात करून तिने आई-बाबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला.
ठरल्याप्रमाणे अकरावी, बारावी व पी.एम.टी.शिक्षण घेण्याकरिता ती त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय लातूरला गेली. तेथील प्राध्यापकांनी तिला मोलाचे सहकार्य केले. बारावी व पीएमटी परीक्षेतसुद्धा ती प्रावीण्यासह उत्तीर्ण झाली अन् तिच्या कष्टाचे फळ तिला मिळाले. तिचा मुंबई येथील जे.जे.हॉपीटलमध्ये एमबीबीएसकरिता नंबर लागला. आता डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे. सध्या ती एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षांचे प्रशिक्षण घेत आहे.

माधवीच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक
वडील शेतकरी, घरची परिस्थिती गरीबीची. त्यात सततची नापिकी. त्यामुळे मुलीच्या एमबीबीएस शिक्षणाचा लाखो रूपयांचा खर्च कसा भागवायचा, असा गंभीर प्रश्न माधवीच्या वडिलांसमोर पडला. एकीकडे मुलगी डॉक्टर होत असल्याचा आनंद, तर दुसरीकडे पैशाची समस्या. त्यामुळे कुटुंबाच्या इतर अडचणी बाजूला ठेवून मोहन सामृतवार स्वत: शेतात राबायचे. मजुरीचे पैसे वाचवायचे आणि माधवीला शिक्षणाकरीता पैसे पाठवायचे. गेले वर्षभर असेच सुरू आहे. मात्र आता माधवीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न कसे साकार करता येईल, ही विवंचना आई-वडिलांसमोर आहे. सरकार, समाजसेवी संस्थांकडून जर तिला मदतीचा हात मिळाला, तर माधवीचे डॉक्टर बनण्याचे ध्येय पूर्ण होऊशकेल. आज माधवीला मदतीची व प्रोत्साहनाची गरज आहे. समाजात अनेक सेवाभावी लोक आहेत. त्यांनी मदतीचा हात दिला, तर माधवीची डॉक्टर बनण्याची संघर्ष यात्रा नक्कीच पूर्ण होईल. मात्र माधवीच्या जिद्दीला सलाम केलाच पाहिजे.

Web Title: MBBS Beats by Overcoming Disability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.