एमबीबीएस डॉक्टरसह पित्याची प्रतीकात्मक धिंड: आदर्श विवाहाला पाच महिन्यातच गालबोट

By सुरेंद्र राऊत | Published: November 3, 2022 07:31 PM2022-11-03T19:31:58+5:302022-11-03T19:32:06+5:30

मुलीकडच्यांनी आपल्या मुलीची बदनामी केली म्हणत डॉक्टर जावई व त्याच्या वडिलांच्या प्रतीकात्मक धिंड काढली.

MBBS doctor and his Father's symbolic funny rally in Ladkhed Yavatmal | एमबीबीएस डॉक्टरसह पित्याची प्रतीकात्मक धिंड: आदर्श विवाहाला पाच महिन्यातच गालबोट

एमबीबीएस डॉक्टरसह पित्याची प्रतीकात्मक धिंड: आदर्श विवाहाला पाच महिन्यातच गालबोट

googlenewsNext

लाडखेड (यवतमाळ) : येथील एका एमबीबीएस युवकाचा ७ मे २०२२ रोजी अकोट येथील एका उच्च शिक्षित युवतीशी विवाह झाला होता. मात्र पाच महिन्यातच त्यांच्या आदर्श विवाहाला गालबोट लागले. मुलीकडच्यांनी आपल्या मुलीची बदनामी केली म्हणत चक्क डॉक्टर जावई व त्याच्या वडिलांच्या प्रतिमेसह गावातून प्रतीकात्मक धिंड काढली. ही घटना येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजता घडली. 

येथील एक युवक एमबीबीएस डॉक्टर आहे. सध्या तो युवक दारव्हा तालुक्यात एका ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. पाच महिन्यांपूर्वी ७ मे रोजी अकोला जिल्ह्यातील अकोट येथील एका युवतीशी त्यांचा विवाह जुळला. साक्षगंधाच्या कार्यक्रमातच आदर्श पद्धतीने दोघांचा विवाह पार पडला. या विवाहाची त्यावेळी पंचक्रोशीत आदर्श विवाह म्हणून गणना झाली. मात्र साक्षगंधातच विवाह उरकण्यात आल्याने काही नातेवाईक नाराजही झाले होते. 

पाच महिन्यांच्या संसारादरम्यान डॉक्टर पती व उच्चविद्याविभूषित पत्नीमध्ये खटके उडायला लागले. त्यानंतर युवतीने आपल्या आई-वडिलांना लाडखेड येथे बोलावून घेतले. जवळपास १५ दिवसांपूर्वी ती त्यांच्यासोबत माहेरी निघून गेली. यादरम्यान तिच्या माहेरच्यांनी डॉक्टर व त्यांच्या वडिलांना समाजाच्या बैठकीत भेटण्यासाठी बोलावले. मात्र ते आलेच नाहीत. दुसरीकडे सासरचे कुटुंब आपल्या मुलीची बदनामी करीत असल्याचा आरोप युवतीच्या कुटुंबातील सदस्यांनी केला. मुलीची समाजात बदनामी झाली असून आमचीही फसवणूक झाल्याचा संताप मुलीच्या माहेरच्यांनी व्यक्त केला.

या संतापातूनच त्यांनी जाहीर निषेध पत्रक काढले. बुधवारी हे पत्रक दारव्हा आणि लाडखेड येथे वाटण्यात आले. त्यानंतर लाडखेड येथे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुलीकडच्यांनी डॉक्टर जावई व त्याच्या वडिलांच्या प्रतिमेसह गावातून त्यांची प्रतीकात्मक धिंड काढली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे. मात्र या प्रकरणी पोलिसात कुणीही तक्रार दाखल केली नाही. 

एका मुलीच्या बापाची आत्मकथा
तरुणीच्या वडिलांनी चक्क जय शिवराय असे वर लिहीत ‘एका मुलीच्या बापाची आत्मकथा’ या शीषर्काखाली पत्रक काढले. या पत्रकाचे दारव्हा आणि लाडखेड येथे वाटप केले. पत्रात त्यांनी शिवरायांच्या स्त्री संरक्षण आणि स्त्रियांचा आदर करण्याचा  उल्लेख केला. मात्र याच आपल्या शिवस्वराज्यात काही बोटांवर मोजण्याइतके षडयंत्र काही समाजकंटक स्त्रियांचा सर्रास अवमान करताना दिसत असल्याचे म्हटले. अशाच षडयंत्राला आम्हीसुद्धा बळी पडल्याचे कथन केले. सासऱ्यांनी आपल्या मुलीची बदनामी केल्याचा पत्रकातून आरोपही केला. मुलीची काहीही चूक नसताना तिला व कुटुंबाला मनस्ताप सोसावा लागत आहे. त्यामुळे खरंच मुली सुरक्षित आहेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: MBBS doctor and his Father's symbolic funny rally in Ladkhed Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.