‘मेडिकल’मध्ये धडकणार ‘एमसीआय’चे पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:21 AM2018-01-09T00:21:19+5:302018-01-09T00:21:52+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमसीआयचे (आयुर्विज्ञान परिषद) पथक येणार असून त्रुट्यांची पूर्तता अहवाल कसा सकारात्मक जाईल, यासाठी धडपड सुरू आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमसीआयचे (आयुर्विज्ञान परिषद) पथक येणार असून त्रुट्यांची पूर्तता अहवाल कसा सकारात्मक जाईल, यासाठी धडपड सुरू आहे. तर सोमवारी परीक्षा पद्धतीचे निरीक्षण करण्यासाठी एमसीआयची एक चमू यवतमाळात दाखल झाली. त्यांनी प्रयोगशाळांसह विविध विभागांची पाहणी केली.
वैद्यकीय अभ्यासक्रमाला मान्यता मिळविण्यासाठी एमसीआयच्या निकषाची पूर्तता करणे आवश्यक असते. यावर्षी एमसीआय जानेवारीच्या अखेर येण्याची शक्यता आहे. त्यासाठी रुग्णालय प्रशासन कामाला लागले आहे. किमान प्रत्येक विभागातील त्रुट्यांची पूर्तता करून एमसीआयचा अहवाल कसा सकारात्मक जाईल, यासाठी धडपड सुरू आहे. शल्यचिकित्सा विभाग (सर्जरी), स्त्रीरोग विभाग, मेडिसीन, अस्थीव्यंगोपचार विभाग, नेत्ररोग विभाग, कान-नाक-घसा विभाग, बालरोग विभाग या ठिकाणी महत्त्वाची काही पदे रिक्त आहेत. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मान्यता मिळविण्यासाठी तसेच विद्यार्थीसंख्या कायम ठेवण्याकरिता ही पदे एमसीआयपूर्वी भरणे आवश्यक आहे. याशिवाय अत्यावश्यक यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
सोमवारी दाखल झालेल्या द्विसदस्यीय एमसीआय चमूने येथील परीक्षा पद्धतीचा आढावा घेतला. त्यानंतर ही समिती दिल्लीला रवाना झाली. आता ‘एमसीआय’च्या मुख्य चमूसमोर प्रेझेन्टेशन करण्याच्या धावपळीत मेडिकल प्रशासन लागले आहे.
त्रुटी निघू नये म्हणून धावपळ
जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेले तीन कोटी रुपये राज्य शासनाने खरेदी प्रक्रियेची एजंसी म्हणून नेमलेल्या हापकिन्स या संस्थेकडे वळते करण्यात आल्या. लवकरच आवश्यक यंत्र सामुग्रींची यादी पाठविली जाणार आहे. कुठल्याही परिस्थितीत दहा टक्केपेक्षा अधिकच्या त्रुट्या निघू नये, याकरिता प्रभारी अधीष्ठाता डॉ.मनीष श्रीगिरीवार प्रयत्न करत आहे. विभाग प्रमुखांचीही धावपळ सुरू असून रिक्त जागांवर डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यासाठी मनधरणी केली जात आहे. शासनस्तरावरून रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्या, यासाठी पत्रप्रपंचाचा रतीब सातत्याने सुरू आहे.