वाईन बारमधील गोळीबार; कुख्यात कवट्या गँगविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2022 03:09 PM2022-12-02T15:09:08+5:302022-12-02T15:14:31+5:30

सात आरोपी सध्या कारागृहात, एकाचा शोध सुरू

MCOCA against notorious gang amid wine bar shooting case in Chhoti Gujri yavatmal | वाईन बारमधील गोळीबार; कुख्यात कवट्या गँगविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई

वाईन बारमधील गोळीबार; कुख्यात कवट्या गँगविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई

Next

यवतमाळ : येथील छोटी गुजरी भागातील एम.पी. जयस्वाल वाईन बारमध्ये दोन महिन्यांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींविरोधात आता मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रस्तावास अमरावती परिक्षेत्राच्या पोलिस उपमहानिरीक्षकांनी बुधवारी मान्यता दिली होती.

छोटी गुजरी भागातील वाईन बारमध्ये कुख्यात गुंड शेख अलीम ऊर्फ कवट्या शेख कलीम, शेख इम्रान ऊर्फ कांगारू शेख शरीफ, रोहित अरविंद जाधव, नईम खान ऊर्फ नईम टमाटर गुलाब नबी खान, आदेश ऊर्फ आद्या अनिल खैरकार, साजिद ऊर्फ रिज्जू सलीम सयानी, अस्लम खान ऊर्फ मारी अकबर खान आणि नयन नरेश सौदागर यांनी पूर्वनियोजितपणे कट करून बारमध्ये दारू पिण्याच्या बिलावरून बारमालकासोबत वाद घातला. यावेळी आरोपींनी चाकू, काठी तसेच बारमधील काचेचे ग्लास फेकून मारले. आरोपी शेख अलीम ऊर्फ कवट्याने देशी कट्ट्यातून फायर करून पाच हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली तसेच बारमालकाला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला.

याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर प्रकरणातील सात आरोपींना अटक करण्यात आली असून हे आरोपी सध्या यवतमाळ कारागृहात आहेत. दरम्यान, सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असून या पथकाद्वारे फरार आरोपी नयन नरेश सौदागर याचाही शोध घेण्यात येत आहे.

उपमहानिरीक्षकांनी दिली कारवाईला परवानगी

सदर गुन्ह्याचे तपासात गुन्ह्यातील आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळीतून वरील गुन्हा केला असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिस अधीक्षक पवन बन्सोड, अपर अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रदीप परदेशी यांनी मोक्का कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव पोलिस उपमहानिरीक्षक अमरावती यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावास बुधवारी उपमहानिरीक्षकांनी मान्यता दिली. त्यामुळे आरोपींविरुद्ध मोक्का कायद्याचे कलम वाढ करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.

मोक्कानुसार दुसरी कारवाई

यवतमाळ शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अशा टोळ्यांविरुद्ध मोक्काअंतर्गत तर सराईत गुन्हेगाराविरुद्ध एमपीडीए, तडीपारीची प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी दिले आहे. त्यानुसार वाईन बारमधील गोळीबार प्रकरणात मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. या वर्षातील मोक्का अंतर्गतची ही दुसरी कारवाई असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी सांगितले.

Web Title: MCOCA against notorious gang amid wine bar shooting case in Chhoti Gujri yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.