मेडिकलचा दंत विभाग फक्त दात काढण्यापुरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:36 AM2017-11-06T00:36:14+5:302017-11-06T00:36:31+5:30

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डेंटल विभागात प्रमुखासह तंत्रज्ञांची मोठी फौज असताना रूग्णांची हेळसांड सुरू आहे.

Medical dental department to remove teeth only | मेडिकलचा दंत विभाग फक्त दात काढण्यापुरता

मेडिकलचा दंत विभाग फक्त दात काढण्यापुरता

Next
ठळक मुद्देरुग्णांची हेळसांड : औषधोपचार नाहीच, मोठी फौज बिनकामाची

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डेंटल विभागात प्रमुखासह तंत्रज्ञांची मोठी फौज असताना रूग्णांची हेळसांड सुरू आहे. केवळ दात उपडण्याव्यतिरक्त येथे कोणताच उपचार केला जात नाही.
या विभागात वृद्धांना सातत्याने येरझारा मारण्यास भाग पाडले जाते. इतके करूनही योग्य उपचार मिळत नाही. मात्र ठराविक रक्कम मोजल्यास तत्परतेने प्रतिसाद दिला जातो. माजी सैनिक गणेश शेंडे हे गेल्या दोन महिन्यांपासून रूग्णालयाच्या डेंटल विभागात चकरा मारत आहे. त्यांना प्रत्येकवेळी साहित्य नसल्याचे कारण पुढे करून दाताची कवळी दिली जात नाही. तारखासुद्धा प्रत्येकवेळी एक ते दोन महिन्यांनी दिल्या जातात. खासगी रूग्णालयात दंत चिकित्सा अतिशय महागडी असते. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक येथेच उपचार घेण्यासाठी येतात. त्यांना प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे सांगून परत पाठविले जाते.
माजी सैनिक गणेश शेंडे यांना लकवा (पॅरालिसिस) झाला आहे. अशाही अवस्थेत दंत विभागातील तथाकथित तज्ज्ञांकडून त्यांना सातत्याने त्रास दिला जात आहे. दंत विभागात दात काढण्यापलिकडे कोणतेच काम केले जात नाही. आरसीसारखे (रूट कॅनल) अत्यावश्यक उपचार करण्यास येथे जाणिपूर्वक टाळाटाळ केली जाते. साहित्य नसल्याच्या बोंबा ठोकून येथे कामचुकारपणा सुरू आहे. या गंभीर प्रकरणाची माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिक गणेश शेंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. यातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
डीनने लक्ष देण्याची गरज
मेडिकल प्रशानाची धुरा अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगीरवार यांच्याकडे आल्यानंतर अनेक सुधारणा झाल्या. बाह्यरूग्ण विभागातील डॉक्टरांची उपस्थिती वाढली. अतिदक्षता कक्षात एका सहायक प्राध्यापकांची ड्युटी लावण्यात आली आहे. अधिष्ठात्यांनी दंत चिकित्सा विभागाकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Medical dental department to remove teeth only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.