‘मेडिकल’ डॉक्टरांची दुकानदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:37 PM2017-09-25T22:37:24+5:302017-09-25T22:37:42+5:30
महिन्याला दीड लाख रुपये वेतन आणि वेतनाच्या ३० टक्के व्यवसायरोध भत्ता (एनपीए) घेऊनही यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बहुतांश डॉक्टरांनी यवतमाळ शहरात आपली खासगी दुकानदारी सुरू केली आहे.
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महिन्याला दीड लाख रुपये वेतन आणि वेतनाच्या ३० टक्के व्यवसायरोध भत्ता (एनपीए) घेऊनही यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बहुतांश डॉक्टरांनी यवतमाळ शहरात आपली खासगी दुकानदारी सुरू केली आहे. रुग्णांना आपल्या खासगी रुग्णालयात वळविण्यासाठी ‘मेडिकल’मध्येच ‘मेडिकल’ची बदनामी केली जाते. यातून शासनाच्या निधीवर दिवसाढवळ्या डल्ला मारून आपले खिसे भरले जात आहे.
यवतमाळात वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात सुसज्ज उपचार यंत्रणा आहे. मात्र उपचाराच्या नावाने येथे कायम बोंबाबोंब असते. या मागील मुख्य कारण म्हणजे येथील कार्यरत डॉक्टरांची खासगी दुकानदारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणलेला रुग्णसेवेचा आव होय. ‘मेडिकल’मध्ये जवळपास दीडशेवर डॉक्टर कार्यरत आहे. ७० हजारांपासून दीड लाखापर्यंत दरमाह वेतन शासनाकडून दिले जाते. खासगी प्रॅक्टीस न करण्यासाठी व्यवसायरोध भत्ता दिला जातो. हा भत्ता वेतनाच्या तब्बल ३० टक्के आहे. विशेष म्हणजे इतर ठिकाणी हा भत्ता १५ टक्के असताना यवतमाळ हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने येथे दुप्पट भत्ता दिला जातो. गलेलठ्ठ पगार घेऊनही या डॉक्टरांचे पोट भरत नाही. त्यामुळेच पत्नी अथवा इतर नातेवाईकांच्या नावाने शहरात खासगी प्रॅक्टीस सुरू केली आहे. शहरात प्रशस्त असे नर्सिंग होम सुरू केले आहे. अधिकाधिक वेळ आपल्या खासगी रुग्णालयात देणारे डॉक्टर ‘उपचारापुरते’ मेडिकलमध्ये जातात. परिणामी येथील रुग्णांची नाडी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या हाती आली आहे. अवगत असलेले पुस्तकी ज्ञान वापरुन हे प्रशिक्षणार्थी डॉक्टर रुग्णांची वेदनेतून सुटका करण्याचा प्रयत्न करतात. एक प्रकारे शासकीय रुग्णालयातील रुग्ण म्हणजे ‘गिनीपीग’ (प्रयोगाचे उंदीर) झाले आहेत.
रुग्ण सेवेचा डांगोरा पिटणारे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांना या प्रकाराशी काहीही देणे घेणे नाही. त्यांचा वशिला घेऊन गेलेल्या रुग्णावरच उपचार करतात. केवळ एका कॉलवर अवघ्या काही मिनिटात तज्ज्ञ डॉक्टर सेवेला हजर होतात. परंतु सामान्य रुग्ण मरणपंथाला लागला तरी साधा वॉर्ड बॉयही त्याच्याकडे ढुंकून पाहत नाही. काही बोटावर मोजण्याइतके डॉक्टरला याला अपवाद आहेत. इमाने इतबारे रुग्णांची सेवा करतात. परंतु त्यांची ही मंडळी खिल्ली उडवितात.
राजकीय रुग्णसेवेचा अवास्तव हस्तक्षेप
स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ वाढदिवशी आरोग्य शिबिर घेऊन सेवा बजावत आहे. रुग्णालयात त्यांनी नियुक्त केलेल्या रुग्णसेवकांमुळेच येथील यंत्रणा कोलमडली आहे. ओपीडीत रांगेत लागणारा गरीब रुग्ण सकाळपासून दुपारपर्यंत तेथेच उभा असतो. शेवटी कधी तरी त्याचा नंबर लागतो. परंतु तोपर्यंत डॉक्टरांना आपल्या खासगी रुग्णालयात जाण्याची घाई झालेली असते. रुग्णसेवेच्या नावावरही गरीब रुग्णांची हेटाळणीच सुरू आहे. आता तर राजकीय रुग्णसेवकांमध्ये स्पर्धा लागली असून डॉक्टर आपल्या पक्षासाठी कसे काम करेल याचा आटापिटा सुरु आहे.