जिवंत महिलेचा मेडिकलने पोलिसांना पाठविला मृत्यू अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 05:00 AM2020-10-08T05:00:00+5:302020-10-08T05:00:11+5:30
उज्वला राजेश वानखडे रा. शांतीनगर वडगाव या महिलेला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. विषबाधेचे प्रकरण असल्याने तिचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविण्यासाठी डॉ. प्रीती खंडारे यांनी मेमो तयार केला. तो मेमो वॉर्डबॉय नीलेश खंडाळकर याच्या माध्यमातून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात पाठविला. पोलिसांनी जबानी घेण्याऐवजी त्या मेमोवरून जिवंत महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद मर्ग डायरीमध्ये घेतली. त्याचा मर्ग क्रमांक ५४/२०२० असा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल रुग्णांचा अकस्मात मृत्यू झाल्यास रुग्णालय प्रशासनाकडून ‘डेथ मेमो’ (मृत्यू अहवाल) संबंधित पोलीस ठाण्यात पाठविला जातो. यवतमाळातील मोठे वडगाव परिसरातील एका महिलेचा डेथ डिक्लीरेशन मेमो (मृत्यूपूर्व जबानी) मंगळवारी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात आला. त्यावरून मर्ग डायरीमध्ये मृत्यूची नोंद घेण्यात आली. नंतर ती महिला जिवंत असल्याचे माहीत झाल्याने मर्गची नोंद रद्द करण्यात आली.
उज्वला राजेश वानखडे रा. शांतीनगर वडगाव या महिलेला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. विषबाधेचे प्रकरण असल्याने तिचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविण्यासाठी डॉ. प्रीती खंडारे यांनी मेमो तयार केला. तो मेमो वॉर्डबॉय नीलेश खंडाळकर याच्या माध्यमातून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात पाठविला. पोलिसांनी जबानी घेण्याऐवजी त्या मेमोवरून जिवंत महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद मर्ग डायरीमध्ये घेतली. त्याचा मर्ग क्रमांक ५४/२०२० असा आहे.
कागदोपत्री उज्वला राजेश वानखडे या महिलेचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात ती महिला जिवंतच असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. तेव्हा अवधूतवाडी पोलिसांनाही धक्का बसला. मर्ग डायरीत मृत्यूची नोंद घेतली आहे, आता काय करायचे तेव्हा पोलिसांनी दाखल केलेला मर्ग परस्पर रद्द केला.
या अनागोंदीमुळे वानखडे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले होते. गफलत झाल्याने जिवंत महिलेला कागदोपत्री मृत्यू घोषित करण्याचा प्रकार झाला. अखेर प्रकरण जास्त वाढविण्यापेक्षा सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला.
सदर महिलेला विषबाधा झाली आहे. त्यामुळे मृत्यूपूर्व जबानी घेण्यासाठी डेथ डिक्लीरेशन अहवाल पाठविला होता. याचा चुकीचा अर्थ घेऊन पोलिसांनी डेथ मेमो समजून मर्ग दाखल केला असावा.
- डॉ. मिलिंद कांबळे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.