मेडिकलच्या डॉक्टरांची ‘कट प्रॅक्टिस’
By admin | Published: July 8, 2017 12:30 AM2017-07-08T00:30:39+5:302017-07-08T00:30:39+5:30
वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील काही डॉक्टरांनी चक्क ‘कट प्रॅक्टिस’ सुरू केल्याने गरीब रूग्णांचा जीव टांगणीला लागला.
तपासणीसाठी खासगीचा सल्ला : रूग्णांची परवड, नाहक आर्थिक भुर्दंड
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील काही डॉक्टरांनी चक्क ‘कट प्रॅक्टिस’ सुरू केल्याने गरीब रूग्णांचा जीव टांगणीला लागला. रूग्णांना विविध तपासण्यांसाठी खासगी रूग्णालयाचा रस्ता दाखविला जात असल्याने गरीब रूग्णांना ‘रोगापेक्षा ईलाज भयंकर’ वाटू लागला आहे.
शासकीय रूग्णालयात दाखल रूग्णाला अतिशय महागड्या तपासण्यांसाठी चक्क शहरातील एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या लॅबमध्ये पाठविण्यात येते. तेथून शासकीय रूग्णालयातील संबंधित डॉक्टरांना पद्धतशीर रॉयल्टी मिळत असल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे, तर शासकीय रूग्णालयातील काही डॉक्टरांकडून अनेकदा रूग्णाला महागडी औषधे लिहून दिली जातात. त्यांचा प्रत्यक्षात उपयोग किती, याची पडताळणीच केली जात नाही.
रूग्णालयात बाह्यरूग्ण तपासणी विभागात विविध औषध कंपन्याचे प्रतिनिधी हजेरी लावतात. त्यातून रूग्णालयात उपलब्ध औधषांना डावलून अनेकदा रूग्णाला महागडी औषधी ठरावीक दुकानातून खरेदी करण्यास सांगितले जाते. त्वरित आराम पडावा म्हणून बाहेरून औषध लिहून देतो, असे सांगून डॉक्टर रूग्णांच्या असहाय्यतेचा लाभ घेतात. मात्र औषध लिहणाऱ्याच्या नावाने तिकडे ‘कमिशन’ तयार असते.
गंभीर रूग्ण रेफर करण्यावरही फिक्सींग केले जाते. त्यासाठी नागपुरातील मोठ्या हॉस्पीटलकडून पायघड्या घातल्या जातात. परिणामी त्याच रूग्णालयात रूग्णाला दाखल करण्याची पद्धतशीर तजवीज केली जाते. त्याकरिता काही विभागातील मशीन बंद असूनही त्या सुुरू करण्याची तसदी घेतली जात नाही. उलट पुरवठादार कंपनी सहकार्य करत नसल्याचे ठेवणीतील उत्तर दिले जाते. यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. त्यातील ठरावीक ‘रसद’ थेट वरिष्ठांपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकप्रकारे या ‘कट प्रॅक्टीस’ला वरिष्ठांकडूनच खतपाणी घातले जात असल्याचे दिसून येते.
प्रसूती विभागात दाखल महिलेला एका श्रध्दा नामक डॉक्टरने एलएफटी, केएफटी, मलेरिया, डेंग्यू व सीबीसी तपासणी करण्यासाठी ‘त्या’ मल्टीस्पेशालिटीत जाण्याचा सल्ला दिला. तेथे तपासणी केली नाही, तर संबंधित डॉक्टरकडून रूग्णाला अतिशय हिन वागणूक दिली जाते. यापूवी याच डॉक्टरने प्रसूती झालेल्या महिलेच्या आईला चक्क मारहाण केली होती. तरीही प्रशासनाकडून डॉक्टरची पाठराखण सुरू आहे.
असा प्रकार रूग्णालयातील सर्व विभागात कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे. परिणामी रूग्णाला तब्बल दोन हजार रूपयांपर्यंतचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. औषधांच्या बाबतीतही महागडे अन्ॅटीबायोटीक बाहेरून आणण्यास सांगितले जाते. त्यावर संबंधितांना मोठी ‘मार्जीन’ मिळते. मात्र रूग्ण भरडले जातात. त्यामुळे ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असा ठरू लागला आहे.
रूग्णसेवेचा आव आणणारे गप्प
शासकीय रूग्णालय परिसरात राजकीय पक्षांमध्ये रूग्णसेवेची स्पर्धा लागलेली असते. मात्र त्यांचे या कट प्रॅक्टीसकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या नेत्यांकडेसुद्धा याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. केवळ रूग्णसेवेचा आव आणून आपण किती दक्ष लोकसेवक आहोत, याची प्रसिद्धी करण्यातच ते धन्यता मानतात. इकडे रूग्णांच्या जीवाशी होणारा खेळखंडोबा त्यांना दिसत आहे. ग्रामीण भागातील गरीब रूग्ण यात भरडले जात असल्याने त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. यातून त्यांची सुटका कोण करणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.