पुसद येथे मेडिकलच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2022 11:39 AM2022-07-07T11:39:36+5:302022-07-07T11:44:19+5:30
तो नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता.
पुसद (यवतमाळ) : एमबीबीएस तृतीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने इसापूर धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली.
परिक्षित पंजाबराव चंद्रवंशी (२२, रा. भाग्यनगर, पुसद) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. मागील चार-पाच दिवसांपूर्वीच त्याचा द्वितीय वर्षाचा निकाल लागला. त्यात तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. सुटी असल्याने काही दिवसांपासून परिक्षित पुसद येथे आपल्या घरी राहत होता.
सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तो घरी काहीही न सांगता दुचाकीने निघून गेला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही, त्यामुळे घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. त्याचे शेवटचे मोबाइल लोकेशन इसापूर धरण येथे मिळाले. परिक्षितने अंचुळेश्वर मार्गाने इसापूर धरण गाठले. तेथे दुचाकी एका झुडपात फेकून त्याने धरणात आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.