‘मेडिकल’च्या विद्यार्थ्यांनी घेतला कोरोनाचा धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 10:05 PM2020-03-16T22:05:06+5:302020-03-16T22:05:21+5:30
नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाने एमबीबीएस प्रथम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक दोन महिन्यांपूर्वीच प्रसिद्ध केले होते. ही परीक्षा सोमवारपासून सुरू होणार होती. ठरल्याप्रमाणे यवतमाळच्या मेडिकलमध्ये परीक्षेची तयार करण्यात आली. मात्र एकही विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आलाच नाही. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेला गैरहजर राहून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा ३० मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात यावे, अशी मागणी अधिष्ठता डॉ. मिलिंद कांबळे यांच्याकडे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जगभरात कोरोना विषाणूची दहशत निर्माण झाली आहे. यवतमाळात तीन रुग्ण आढळल्यानंतर एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या २०० विद्यार्थ्यांनी सोमवारी असलेल्या पेपरला सामूहिक बंक मारला. त्यामुळे परीक्षाच झाली नाही.
नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाने एमबीबीएस प्रथम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक दोन महिन्यांपूर्वीच प्रसिद्ध केले होते. ही परीक्षा सोमवारपासून सुरू होणार होती. ठरल्याप्रमाणे यवतमाळच्या मेडिकलमध्ये परीक्षेची तयार करण्यात आली. मात्र एकही विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आलाच नाही. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेला गैरहजर राहून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा ३० मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात यावे, अशी मागणी अधिष्ठता डॉ. मिलिंद कांबळे यांच्याकडे केली.
परीक्षा वेळापत्रक हे आरोग्य विद्यापीठाकडून दिले जाते. त्यात फेरबदल करण्याचा महाविद्यालय पातळीवर कोणालाच अधिकार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला त्यांच्या मागणीचे लेखी निवेदन अधिष्ठातांना मागितले. आता हे निवेदन आरोग्य विद्यापीठाचे कु लगुरू यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक कायम ठेवले आहे. त्यांची परीक्षा निर्धारित वेळेतच होणार आहे. मात्र मेडिकलच्याच विद्यार्थ्यांनी कोरोनाचा धसका सर्वाधिक घेतल्याचे दिसून येते. आता यावर आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत. तर ३७ संशयितांना कॉरेंटाईन केले आहे. रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना भीती वाटत आहे. त्यांच्या पालकांकडूनही परीक्षा पुढे घेण्यात यावी, अशी मागणी आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा येथील वैद्यकीय महाविद्यालय परिसरातच घेतली जाणार आहे. याच परिसरातील आयसोलेशन वॉर्डमध्ये कोरोनाच्या तीन रुग्णांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सतर्कता घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली आहे.
जिल्हा न्यायालयावरही कामाची ‘मर्यादा’
कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहे. उच्च न्यायालयाने यवतमाळ जिल्हा न्यायालयाला आवश्यक खटल्यातच सुणावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. इतर खटल्यामध्ये तारीख दिली जात आहे. याबाबतचा आदेश उच्च न्यायालयाकडून प्राप्त झाल्याची माहिती यवतमाळ जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड़ राजेंद्र बारडकर यांनी ‘लोकमत’ला दिली.