मेडिकल अधीक्षकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:00 AM2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:23+5:30
चर्चा सुरू असताना डॉ.येडशीकर यांनासुद्धा बोलाविण्यात आले. दरम्यान कार्यालय अधीक्षक गणेश श्रीहरी उत्तरवार यांना ओपीडीच्या वेळेबाबत चर्चा करण्यासाठी अधिष्ठातांनी आपल्या कक्षात बोलाविले. यावेळी चर्चा सुरू असताना संतोष ढवळे यांनी उत्तरवार यांना दोन वेळा गेट-आऊट म्हटले, त्यानंतर अचानक उत्तरवार यांची खुर्ची सरकवीत त्यांना कानशिलात लगावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने कार्यालय अधीक्षकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. त्यामुळे अनेक तास रुग्णसेवा खोळंबली.
ओपीडी २४ तास का ठेवत नाही याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे शुक्रवारी सकाळी वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्याकडे पोहोचले. यावेळी तेथे डॉ. शेख, डॉ. भलावी उपस्थित होते. चर्चा सुरू असताना डॉ.येडशीकर यांनासुद्धा बोलाविण्यात आले. दरम्यान कार्यालय अधीक्षक गणेश श्रीहरी उत्तरवार यांना ओपीडीच्या वेळेबाबत चर्चा करण्यासाठी अधिष्ठातांनी आपल्या कक्षात बोलाविले. यावेळी चर्चा सुरू असताना संतोष ढवळे यांनी उत्तरवार यांना दोन वेळा गेट-आऊट म्हटले, त्यानंतर अचानक उत्तरवार यांची खुर्ची सरकवीत त्यांना कानशिलात लगावली. या प्रकाराबाबत अधिष्ठातांनी ढवळे यांना माफी मागण्यास सांगितले. मात्र माफी न मागता ढवळे कक्षातून बाहेर पडले. या घटनेची माहिती मिळताच मेडिकलच्या सर्व डॉक्टर व कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले. महाविद्यालयाच्या आवारात येऊन ढवळे व शिवसेनेविरोधात घोषणा बाजी केली. त्यानंतर आंदोलनकांपैकी अर्धेअधिक लोक अधिष्ठाता डॉ. श्रीगिरीवार यांच्या नेतृत्वात पायदळ मोर्चा काढत यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात धडकले. तेथे उत्तरवार यांच्या तक्रारीवरून ढवळेविरुद्ध भादंवि ३५३, ३३२ व वैद्यकीय सेवा-व्यक्ती हानी व नुकसान अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वृत्तलिहिस्तोवर ढवळेला अटक करण्यात आली नव्हती. ही अटक तत्काळ व्हावी अशी मागणी आहे.
तीन विभागात रुग्णांच्या रांगा
मारहाणीच्या घटनेनंतर डॉक्टर व कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने रक्तपेढी, एक्स-रे व औषधी विभागाचे कामकाज चांगलेच प्रभावित झाले. तेथे रुग्णांच्या लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान संतोष ढवळे यांनी यापूर्वीसुद्धा कायदा हातात घेण्याचा प्रकार केला होता. त्याच वेळी त्यांना प्रतिबंध घातला असता तर शुक्रवारची मारहाणीची घटना घडली नसती, असे परिचारिकांनी सांगितले. यावेळी त्यांनी ढवळे व शिवसेनेविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत घोषणा दिल्या.
संतोष ढवळेंनी केलेला मारहाणीचा प्रकार अतिशय निंदनीय आहे. अजामीनपात्र गुन्हा असल्याने ढवळे विरोधात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
- डॉ. मनीष श्रीगिरीवार,
अधिष्ठाता, मेडिकल कॉलेज
ढवळेंनी मला गेट-आऊट म्हणत मारहाण केली. स्वत: डीन व उपस्थित डॉक्टर याचे साक्षीदार आहेत.
- गणेश उत्तरवार,
कार्यालय अधीक्षक, मेडिकल