‘मेडिकल’ला अखेर चार व्हेन्टीलेटर मिळणार
By admin | Published: September 20, 2015 12:07 AM2015-09-20T00:07:12+5:302015-09-20T00:07:12+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्हेन्टीलेटरअभावी रुग्णांना प्राण गमवावे लागत होते. याबाबत सर्व सामान्यांकडून सातत्याने ओरड सुरू होती.
रुग्णांना दिलासा : सोनालीचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला सूचले शहाणपण
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्हेन्टीलेटरअभावी रुग्णांना प्राण गमवावे लागत होते. याबाबत सर्व सामान्यांकडून सातत्याने ओरड सुरू होती. मात्र प्रशासनाने याची दखलच घेतली नाही. ‘लोकमत’ने हा मुद्दा उचलल्यानंतर जनभावना उफाळून आली. त्यानंतर तातडीने चार व्हेन्टीलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर, पुणे व नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्हेन्टीलेटर मागविण्यात आले आहे.
यवतमाळ रुग्णालयात सर्वाधिक विष प्राशन आणि सर्पदंशाचे रुग्ण येतात. यातील रुग्णांना जीवन रक्षक प्रणाली असलेल्या व्हेन्टीलेटरची नितांत गरज भासते. रुग्णालयात सध्या सात व्हेन्टीलेटर असून त्यापैकी तीन बंद आहे. त्यामुळे चार व्हेन्टीलेटरवरच ताण वाढला, अशा स्थितीत कोणता रुग्ण व्हेन्टीलेटरवर ठेवायचा आणि कुणाला काढायचे हा प्रश्न डॉक्टरांपुढे निर्माण व्हायचा. एकाला वाचविण्यासाठी दुसऱ्याचा जीव घेणे असाच प्रकार करण्याची वेळ येथील डॉक्टरांवर आली होती. मात्र त्या उपरही प्रशासनाकडून या गंभीर समस्येबाबत ठोस उपाययोजना केली जात नव्हती. त्यातच बाळंतिणीचा मृत्यू झाला. नंतर चाकू हल्ल्यातील गंभीर जखमी तरुणीचाही मृत्यू झाला. यावरून लोहारा येथील ग्रामस्थांनी थेट अधिष्ठाताला घेराव घालून रोष व्यक्त केला. त्यानंतर निर्ढावलेले प्रशासन ताळ्यावर आले. किमान तात्पुरती व्यवस्था म्हणून तरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून प्रत्येकी एक व्हेन्टीलेटर काही दिवसांसाठी मागिवण्यात आले. याच प्रमाणे पुणे व नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून व्हेन्टीलेटर मागविण्यात आले आहे. चार पैकी एक व्हेन्टीलेटर सायंकाळपर्यंत रुग्णालयाला प्राप्त होईल, अशी माहिती अधीक्षक रोहिदास चव्हाण यांनी दिली. (कार्यालय प्रतिनिधी)