मीरा ठाकरे यांना मायबोली सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 09:41 PM2018-09-03T21:41:02+5:302018-09-03T21:41:19+5:30
कविवर्य शंकर बडे स्मृती मायबोली सन्मान पुरस्कार मीराताई ठाकरे यांना प्रदान करण्यात आला. शंकर बडे गोतावळ्याच्यावतीने येथे महेश भवनात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी प्रकाश जोशी होते. प्रमुख वक्त्या म्हणून राजश्री हेमंत पाटील लाभल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कविवर्य शंकर बडे स्मृती मायबोली सन्मान पुरस्कार मीराताई ठाकरे यांना प्रदान करण्यात आला. शंकर बडे गोतावळ्याच्यावतीने येथे महेश भवनात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी प्रकाश जोशी होते. प्रमुख वक्त्या म्हणून राजश्री हेमंत पाटील लाभल्या होत्या.
मीराताई ठाकरे या विदर्भाच्या बहिणाबाई म्हणून प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी भाषेत काव्यरचना करून स्वत: गायणाने काव्य सादर करणाऱ्या मीराताई या शंकर बड्या यांच्या काव्यांच्या उत्तराधिकारी म्हणून ओळखल्या जातात. सत्कार प्रसंगी त्यांनी अनेक वऱ्हाडी कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. यावेळी शंकर बडे यांच्या सहधर्मचारिणी कौसल्याबाई बडे विचारपीठावर उपस्थित होत्या.
याप्रसंगी राजश्री हेमंत पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन नितीन पखाले, प्रास्ताविक विवेक कवठेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.ताराचंद कंठाळे यांनी करून दिला. मानपत्राचे लेखन विवेक कवठेकर यांचे होते तर वाचन जीवन कडू यांनी केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात शंकर बडे यांच्या काव्य गायनाचा कार्यक्रम झाला. अंजली सरूळकर, दत्तात्रय देशपांडे, गजानन बडे, जयंत चावरे आदींनी यात सहभाग घेतला. यावेळी प्रामुख्याने माधवराव कैपिल्यवार, बाळासाहेब सरोदे, प्राचार्य शंकरराव सागळे, प्रा.डॉ. विवेक देशमुख, बाळासाहेब वगारे, प्रा. दिनकर वानखेडे, जयंत शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘गोतावळ्याची गंगाजळी’
यवतमाळातील पेशवे प्लॉट ते महादेव मंदिर या रोडला शंकर बडे यांचे नाव देण्याचा ठराव नगरपरिषदेने गतवर्षी मंजूर केला. त्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद करण्यासाठी ‘गोतावळ्याची गंगाजळी’ स्थापन करून संयुक्त खात्यात पैसे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. कमी पडणारा निधी आमची संस्था देईल, असे आश्वासन राजश्री पाटील यांनी यावेळी दिले.