राज्यमंत्र्यांसह आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: February 13, 2017 01:20 AM2017-02-13T01:20:16+5:302017-02-13T01:20:16+5:30
तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि कळंब तालुका विकास आघाडीत काट्याची लढत आहे.
कळंबमध्ये घमासान : प्रवीण देशमुखांसाठी अस्तित्वाची लढाई, डोंगरखर्डा-जोडमोहा गटाची निवडणूक लक्षवेधी, नाराजांचीही मोठी संख्या
गजानन अक्कलवार कळंब
तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि कळंब तालुका विकास आघाडीत काट्याची लढत आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार डॉ.अशोक उईके, माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रा.वसंत पुरके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे.
यापूर्वी झालेल्या निवडणुकीचा इतिहास पाहिल्यास कळंब तालुक्यात शिवसेना आणि भाजपाला निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारही सापडत नव्हता. त्यामुळे आजपर्यंत या दोन्ही पक्षाला खातेही उघडता आलेले नाही, ही वास्तविकता आहे. मात्र या निवडणुकीत दोन्ही पक्षाकडे इच्छुकांनी रांगा लावल्या. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसमधील अनेक इच्छुकांनी या पक्षांचा उंबरठा झिजविला. काहींना तिकीटही मिळाले. यावरुन या दोन्ही पक्षांची वाढती लोकप्रियता अधोरेखित होते. असे असले तरी, या दोन्ही पक्षांचे किती उमेदवार निवडून येतील, हे ठामपणे सांगणे कठीणच आहे.
महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे सख्खे भाऊ विजय राठोड हे डोंगरखर्डा-जोडमोहा गटातून रिंगणात आहे. या जागेवर खरी तर त्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे शिवसेनेची सर्व ताकद याच गटात खर्ची घातली जात आहे. कुठल्याही परिस्थितीत ही जागा खेचून आणायचीच यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. आमदार डॉ.अशोक उईके यांनी आपले अस्तित्व टिकविण्यासाठी जोरदार तयारी चालविली आहे. यासाठी त्यांनी ‘इलेक्टीव मेरीट’चा आधार घेत उमेदवारी बहाल केली. त्यासाठी बाहेरुन आलेल्या व भाजपाचे कधीही काम न करणाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. यावरून त्यांना काहीही करून भाजपाच्या चिन्हावर उमेदवार निवडून आणायचे आहे, हे सिध्द होते. परंतु यामध्ये ते कितपत यशस्वी होतात, याचेच आखाडे बांधले जात आहे.
प्रा.वसंत पुरके यांच्यासाठी ही निवडणूक परीक्षेचा काळ ठरणारी आहे. कळंब तालुक्यावर आतापर्यंत काँग्रेसचेच वर्चस्व राहीले होते. परंतु या वर्चस्वाला हळूहळू उतरती कळा लागली. परिणामी त्यांना विधानसभेत पराजयाचा सामना करावा लागला. सत्ता प्राप्त करून त्यांना पक्षात नवचैतन्य निर्माण करावयाचे आहे. यासाठी ते जीवाचे रान करीत आहे. परंतु तिकीट वाटपात निष्ठावानांना डावलल्याचा ठपका ठेवत पक्षातील अनेक जण इतरांना मदतीचा ‘हात’ देण्याच्या कामी लागले आहे. यातून ते कसा मार्ग काढतात, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकला. तत्पूर्वी त्यांनी प्रवेशासाठी सर्वच पक्षांची चाचपणी केली. परंतु कुठल्या पक्षात प्रवेश घ्यावा, याचा ते निर्णय घेऊ शकले नाही. आता ते कळंब तालुका विकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणुकीला सामोरे जात आहे. यापूर्वीही त्यांना स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा अनुभव आहे. त्यात त्यांना प्रत्येकवेळी यश मिळालेही. परंतु तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत मोठा बदल झाला. यापुढे त्यांना आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवायचे असेल तर उमेदवारांना निवडून आणण्या शिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठी त्यांनी केवळ दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समितीवर लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये ते कितपत यशस्वी होतात, हे काळच ठरविणार आहे.