मिटींग, दौऱ्याच्या नावाखाली पंचायत समितीत ठणठणाट
By admin | Published: May 6, 2017 12:14 AM2017-05-06T00:14:23+5:302017-05-06T00:14:23+5:30
मजुरी बुडवून, प्रवासाचा खर्च करून, शारीरिक त्रास सहन करून काम घेऊन येणाऱ्या नागरिकांना पंचायत समिती कार्यालयातून आल्यापावली परत जावे लागते.
नेर येथील कार्यालय बेवारस : सर्वसामान्य नागरिकांना त्रास
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : मजुरी बुडवून, प्रवासाचा खर्च करून, शारीरिक त्रास सहन करून काम घेऊन येणाऱ्या नागरिकांना पंचायत समिती कार्यालयातून आल्यापावली परत जावे लागते. या कार्यालयामध्ये दौरा, मिटींगच्या नावाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांचा नियमित राहणारा ठणठणाट यामुळे नागरिक वैतागले आहे. वरिष्ठांकडूनही या विषयी कारवाईसंदर्भात कुठलीही ठोस पावले उचलली जात नाही.
प्रस्तुत प्रतिनिधीने शुक्रवारी या कार्यालयाला भेट दिली असता वास्तव पुढे आले. विविध कामे घेऊन नागरिक अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा करत होते. दुपारचे १२ वाजले तरी केवळ चार कर्मचाऱ्यांची हजेरी लागली होती. संबंधित टेबलवरील कर्मचारी केव्हा येतात अशी विचारणा नागरिकांकडून केली जात होती. त्यावर साहेब दौऱ्यावर आहेत, मिटिंगला गेले असे उत्तर कार्यालयात हजार झालेल्या कर्मचाऱ्यांकडून दिले जाते. कार्यालयाच्या आवारात आलेला एखादा व्यक्ती संबंधित टेबलवरील असावा, अशी आशाळभूत नजर नागरिकांची त्याच्याकडे लागत होती. मात्र तो ही कुठले तरी काम घेऊन आलेला असायचा.
नेर पंचायत समिती कार्यालयात ३९ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील सहा जण रजेवर असल्याचे सांगण्यात आले. १२ कर्मचारी दौऱ्यावर असल्याची माहिती देण्यात आली. कार्यालयात चार अधिकाऱ्यांपैकी केवळ एकाची हजेरी होती. गटविकास अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
कृषी विभागात तर वेगळाच अनुभव नागरिकांना येतो. कर्मचारी हजर होण्यापूर्वी दलालांची हजेरी लागते. एखादे काम केव्हा होणार, होणार की नाही याची उत्तरे या दलालांकडूनच मिळतात. टेबल रिकामा असला तरी दलाल मात्र काम हमखास होण्याची खात्री देतात. दिवस वाया जाऊ नये म्हणून काम घेऊन आलेला माणूस दलालांना बळी पडतो. कार्यालय बंद होण्याची वेळ झाली तरी साहेब, आलेच नाही, असे सांगितले जाते.
दलालांची ही खेळी मानसिक त्रास देणारी ठरत आहे. बाल विकास कार्यालय, शिक्षण विभाग या कार्यालयांची परिस्थिती या पेक्षा वेगळी नाही. ती बदलविण्याची गरज निर्माण झाली आहे. हा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी आहे.