जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीवर २३ ला बैठक
By admin | Published: July 18, 2014 12:21 AM2014-07-18T00:21:52+5:302014-07-18T00:21:52+5:30
सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. अजूनही लाखो हेक्टरवर खरिपाची पेरणीच झाली नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न अशा एक ना अनेक समस्या
यवतमाळ : सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. अजूनही लाखो हेक्टरवर खरिपाची पेरणीच झाली नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, चाऱ्याचा प्रश्न अशा एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी २३ जुलै रोजी बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीमध्ये सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, आरोग्य अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, पाणीपुरवठा उपअभियंता, सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती उपस्थित राहणार आहे. विभाग प्रमुख, सर्व जिल्हा परिषद विषय समिती सभापती, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी या बैठकीत राहणार आहे. येथे पशु, कृषी, आरोग्य आणि पाणीटंचाई या मुद्यांवर भर दिला जाणार आहे. स्थानिक पातळीवरून तातडीने कुठल्या उपाययोजना करण्यात येतात याचा आढावा प्रत्येक पंचायत समितीनिहाय होणार आहे. बाभूळगाव, आर्णी, नेर या तालुक्यांचा सकाळी ९ ते ११, त्यानंतर उमरखेड, महागाव, पुसद, दिग्रस ११ ते १, वणी, मारेगाव, झरी, पांढरकवडा तालुक्यांचा दुपारी २ ते ४ आणि ४ ते ६ या वेळात दारव्हा, घाटंजी, राळेगाव, कळंब, यवतमाळ तालुक्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामध्ये शासनाकडून मदतीसाठीचा ठरावही घेण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना अशा स्थितीत कोणत्या अडचणी येतात. त्याबाबत कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. पाऊस आल्यास कोणते पीक घ्यावे, त्याच्या बियाण्याची उपलब्धता, खतांची स्थिती याबाबतही आढावा घेतला जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)