‘वसंत’साठी आज मुंबईत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 09:30 PM2019-07-29T21:30:22+5:302019-07-29T21:30:41+5:30
गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याला सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य मिळावे म्हणून देवरा समितीच्या निर्देशानुसार ३0 जुलै रोजी मुंबईत सहकार, मदत व पुनर्वसन विभागातर्फे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याला सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य मिळावे म्हणून देवरा समितीच्या निर्देशानुसार ३0 जुलै रोजी मुंबईत सहकार, मदत व पुनर्वसन विभागातर्फे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला सहकार मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, आमदार राजेंद्र नजरधने, सहकार विभागाचे प्रधान सचिव, साखर आयुक्त, प्रादेशिक संचालक (साखर) अमरावती, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, वसंत सहकारी साखर कारखाना तथा विषयाशी सबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. सहकार मंत्री देशमुख यांनीच याबाबतचे पत्र २५ जुलैला निर्गमीत केले. विदर्भातील सहकार क्षेत्रातील एकमेव पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. कारखान्याकडे १00 कोटींच्यावर कर्ज, कर्मचाऱ्यांचे वेतन, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे देणे बाकी आहे. अनेक वर्षांपूर्वीच कारखाना आर्थिकदृष्ट्या डबघाईस आला होता. गेल्या तीन वर्षात दोनदा कारखान्याचे अध्यक्षसुद्धा संचालक मंडळाने बदलले. तरीही कारखान्यास उर्जीतावस्था प्राप्त झाली नाही.
कारखाना सुरु करण्यास प्रयत्न तोकडे पडल्याने शेतकरी, कर्मचारी, त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबीय यांचे हाल सुरू आहे. पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. शेतकरी, मजूर व कर्मचाºयांची कामधेनू पूर्ववत सुरु व्हावी, यासाठी, शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे डबघाईस येऊन बंद पडलेल्या कारखान्याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने देवरा समितीची स्थापना केली.
देवरा समितीच्या निर्देशानुसार कारखान्याला अर्थसहाय्य मिळावे म्हणून सहकार विभागाने ३० जुलै रोजी महत्त्वपूर्ण बैठक बोलाविली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मुंबईतील दालनात ही बैठक होणार आहे.
पाच तालुक्यातील शेतकरी, मजूर संकटात
गेलया तीन वर्षांपासून ‘वसंत’ बंद असल्याने पाच तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, मजूर, कर्मचारी संकटात सापडले आहेत. त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहे. पाचही तालुक्यासाठी हा कारखाना कामधेनू ठरला होता. मात्र तीन वर्षांपासून बंद असल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यामुळे मुंबई होणाºया बैठकीकडे पाचही तालुक्यातील सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.