उमरखेड तालुक्यातील समस्यांवर सभेत खडाजंगी
By Admin | Published: May 19, 2017 01:57 AM2017-05-19T01:57:35+5:302017-05-19T01:57:35+5:30
पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन होऊन काही महिने झाले असतानाही उमरखेड तालुक्यातील समस्या जैसे थे आहेत.
काँग्रेस आक्रमक : पंचायत समितीची मासिक सभा गाजली
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन होऊन काही महिने झाले असतानाही उमरखेड तालुक्यातील समस्या जैसे थे आहेत. यावर गुरूवारी पंचायत समितीमध्ये झालेल्या मासिक सभेत चांगलीच खडाजंगी झाली. विशेषत: काँग्रेस पदाधिकारी आक्रमक दिसले. तालुक्यातील प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.
सध्या पंचायत समितीचे सभापती शिवसेनेचे तर उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. असे असताना तालुक्याचा विकास मात्र शून्य आहे. पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या योजनांचीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. याच मुद्द्यावर काँग्रेसचे पाचही सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सभापती प्रवीण मिरासे यांनी, हयगय करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी धास्तावले आहेत.
पंचायत समितीमध्ये निवडणुकीनंतर काँग्रेस पाच, शिवसेना तीन, राष्ट्रवादी तीन व भाजपा एक असे संख्याबळ आहे. त्यानंतर सत्तेमध्ये येण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले व त्यांनी सभापती व उपसभापती पद मिळविले. तर काँग्रेस व भाजपा या दोन पक्षांची युती झाली. त्यामध्ये दोन्ही गटांकडे सहा-सहा असे समान संख्याबळ झाल्यामुळे सभापती व उपसभापती या पदांसाठी ईश्वरचिठ्ठीने निवड करण्यात आली. त्यात सेनेचे प्रवीण मिरासे सभापतीपदी तर राष्ट्रवादीच्या विशाखा जाधव उपसभापतीपदी विराजमान झाल्या. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून उमरखेड तालुक्यात येणाऱ्या एकूण १०० ग्रामपंचायतींमधील अनेक गावांमधील अद्याप पाणी, आरोग्य, रस्ते, शौचालय, घरकूल या मुलभूत समस्या कायम आहेत. या प्रश्नांसाठी आजही सर्वसामान्य नागरिकांना पंचायत समितीमध्ये येरझारा माराव्या लागत आहेत. परंतु त्यांना न्याय मिळत नाही. अनेकवेळा संबंधित अधिकारी भेटतच नाहीत. त्यामुळे नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागते. ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक आदींची असंख्य पदे रिक्त आहेत. ते भरले जात नाही. त्यामुळे विकासात्मक कामांना गती मिळत नाही. म्हणून गुरूवारी उमरखेड पंचायत समितीमध्ये प्रवीण मिरासे यांच्या अध्यक्षतेत सभा घेण्यात आली.
यामध्ये गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, सहाय्यक गटविकास अधिकारी सचिन खुडे, गट शिक्षणाधिकारी एस.डी. दुधे, तालुका अरोग्य अधिकारी आशीष पवार, तालुका पशू वैद्यकीय अधिकारी एस.के. वाठोरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी व्ही. के. मोगरकर आदींसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांवर काँग्रेसचे पंचायत समितीमधील गटनेते प्रज्ञानंद खडसे, बालाजी आगलावे, संगीता वानखेडे, नयन पुदलवाड, रक्षा माने यांनी आक्रमकपणे समस्या मांडून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे सभापती मिरासे यांनीही कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला शिवसेनेचे गजानन सोळंके, सुमित्रा दोडके, राष्ट्रवादीच्या उपसभापती विशाखा जाधव यांच्यासह सुनंदा पराठे, प्रेमाबाई मुसळे आदींची उपस्थिती होती.