स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांनी लढा उभारावा
By admin | Published: August 15, 2016 01:18 AM2016-08-15T01:18:29+5:302016-08-15T01:18:29+5:30
स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांचे अधिकार गोठविल्याने या संस्थांचे सदस्य नामधारी राहण्याची भीती आहे.
श्रीहरी अणे : यवतमाळात विदर्भवाद्यांची बैठक
यवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांचे अधिकार गोठविल्याने या संस्थांचे सदस्य नामधारी राहण्याची भीती आहे. त्यामुळे यासाठी आता संघटनात्मक लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी महाधिवक्ता आणि विदर्भवादी अॅड. श्रीहरी अणे यांनी येथे केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यवतमाळ मतदारसंघातून स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर उमेदवारी देण्यासंदर्भात येथील टिंबर भवनात रविवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाभरातील शंभरावर नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. यासभेला दीपक निलावार, माजी आमदार विजयाताई धोटे, मंगलबाबू चिंडालिया, रफीक रंगरेज उपस्थित होते. अॅड. अणे म्हणाले, घटनेने पंचायतराज व्यवस्थेतून ग्रामपंचायतींना व स्थानिक स्वराज्य संस्थांंना मोठे अधिकार दिले आहे. मात्र गेल्या काही दिवसात या अधिकारांवर टाच आणली जात आहे. हा प्रकार घटनाविरोधी आहे. नगरसेवकांना जनाधिकार बजावता येत नसेल तर त्यांच्या पदाला किंमत राहणार नाही. त्यामुळे सर्वांनीच पक्षभेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेसाठी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांचा प्रतिनिधी पाठविला जातो. या प्रतिनिधीने सदस्यांच्या समस्या मांडणे अपेक्षित आहे. वेगळ्या विदर्भाच्या लढाईत आता नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांनीही सक्रिय होत विदर्भवादी विचारधारेच्या उमेदवारालाच पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. विदर्भाच्या मागणीसाठी सर्वच पक्षातील पदाधिकारी आमच्या सोबत आहे. हाच अजेंडा घेऊन ही निवडणूक लढवावी, यासाठी विदर्भवादी नेते मंगल चिंडालिया हे सक्षम उमेदवार असल्याचेही अॅड. अणे यांनी जाहीर केले. या सभेत जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा, सहा नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते. प्रत्येकांनी यावेळी आपले मत मांडले. या समन्वय सभेतूनच स्थानिक स्वराज्य संस्था सदस्यांची स्वतंत्र संघटना असावी यावर सर्वांचे एकमत झाले. (कार्यालय प्रतिनिधी)