हमीदराच्या बोलीवर व्यापाऱ्यांचा दबाव

By admin | Published: January 8, 2017 12:58 AM2017-01-08T00:58:35+5:302017-01-08T00:58:35+5:30

तुरीच्या पडलेल्या दराला संजीवनी मिळावी म्हणून खुल्या बाजारातून हमीदराने तूर खरेदीचा अधिकार हमी केंद्रांना देण्यात आला.

Mercenaries' pressure on Hamidar's bid | हमीदराच्या बोलीवर व्यापाऱ्यांचा दबाव

हमीदराच्या बोलीवर व्यापाऱ्यांचा दबाव

Next

शेतकरी वाऱ्यावर : खुल्या बाजारात बोलीवर प्रश्नचिन्ह
यवतमाळ : तुरीच्या पडलेल्या दराला संजीवनी मिळावी म्हणून खुल्या बाजारातून हमीदराने तूर खरेदीचा अधिकार हमी केंद्रांना देण्यात आला. त्यासाठी खुल्या बाजारात बोली लावण्याचा अधिकार देण्यात आला. मात्र या अधिकारावर दबाव निर्माण करण्याची मोहीम व्यापाऱ्यांनी सुरू केली. त्यामुळे खुल्या बाजारात हमीदराने तुरीची बोली लागणार किंवा नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डाळवर्गीय पिकांचा पेरा वाढविण्याचे आवाहन सरकारने केले. मात्र या शेतमालाला चांगले दर देण्याची शाश्वती शासनाने दिली नाही. परिणामी तूर बाजारात येताच तुरीचे दर कोसळले. हे दर हमी दराच्या खाली आहेत. हमीदर आणि प्रत्यक्षात बाजारातील दर यात तब्बल १२०० रूपयांची तफावत आहे. केंद्र शासनाने तुरीला प्रती क्विंटल ५०५० रूपये हमी दर जाहीर केले. तथापि बाजारात प्रत्यक्षात ३८०० ते ४२०० रूपये क्विंटल दराने नवीन तुरीची खरेदी होत आहे. यात शेतकऱ्यांना क्विंटलमागे १२०० रूपये कमी मिळत असल्याने ते प्रचंड हादरले आहे.
या स्थितीत तुरीला हमी केंद्राचाच आधार आहे. शेतकरी या केंद्रांकडे मोठ्या प्रमाणात जाण्याची शक्यता आहे. यामुळे धास्तावलेल्या व्यापाऱ्यांनी हमी केंद्र सुरू होण्यापूर्वीच दबावतंत्र निर्माण करण्यास प्रारंभ केला आहे. तूर खरेदी करायची असेल, तर सर्वच करा, नाही तर एकाच ठिकाणी तूर खरेदी सुरू ठेवा, असा अप्रत्यक्ष निरोप त्यांनी सरकारी केंद्र चालकांपर्यंत पोहचविला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीचा अनुभव लक्षात घेता हमी केंद्र चालकांनी दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे.
बाजार समितीमध्ये तुरीचे खरेदी केंद्र सुरू झाले तरी ते एकाच ठिकाणी राहणार आहे. यामुळे हमी केंद्र सुरू झाले, तरी शेतकऱ्यांच्या तुरीला दर मिळण्याची शक्यता कमीच आहे. यातून व्यापाऱ्यांनाच लाभ होणार आहे. शेतकऱ्यांचे मात्र नुकसानच होणार आहे. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हमी केंद्र चलकांना संरक्षण पुरविण्याची नितांत आवशकता आहे. तरच हमी केंद्र उघडण्याचा उद्देश सफल होणार आहे. (शहर वार्ताहर)

जिल्ह्यात केवळ चार केंद्र
जिल्ह्यात तूर खरेदीसाठी नाफेडचे दोन आणि एफसीआयचे दोन, असे चारच हमी केंद्र सुरू झाले आहे. यवतमाळ, बाभूळगाव, राळेगाव आणि आर्णी येथे ही केंद्रे सुरू झाली आहे. उर्वरित १२ तालुक्यांमध्ये तूर खरेदी केंद्रच नाही. त्यामुळे यात्तालुक्यातील शेतकऱ्यांना तूर बाजारात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. याला आळा घालण्यासाठी १२ केंद्रावर खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

Web Title: Mercenaries' pressure on Hamidar's bid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.