व्यापाऱ्यांच्या आंब्याला राजाश्रय, तुरीची हयगय
By admin | Published: May 20, 2017 02:34 AM2017-05-20T02:34:53+5:302017-05-20T02:34:53+5:30
मोजून पाच दुकानांचा बाजार अन् नाव ठेवले महोत्सव. शेतकऱ्यांच्या नावाने आयोजित आंबा महोत्सवाच्या
बळीराजा चेतना अभियानाची ‘पोलखोल’ : दत्त चौकातून खरेदी केलेले आंबे आणले विक्रीला
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मोजून पाच दुकानांचा बाजार अन् नाव ठेवले महोत्सव. शेतकऱ्यांच्या नावाने आयोजित आंबा महोत्सवाच्या आडून जिल्हाधिकारी कार्यालयात चक्क व्यापाऱ्यांनी आंबे विकले. तेही कार्बाइडने पिकविलेले आंबे चढ्या दराने ग्राहकांच्या माथी मारण्यात आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे, असा गंभीर आरोप करीत लोकजागृती मंचचे प्रमुख देवानंद पवार यांनी पत्रकार परिषदेत बळीराजा चेतना अभियानाची पोलखोल केली. व्यापाऱ्यांच्या आंब्याला राजाश्रय दिला, मात्र शेतकऱ्यांची तुरी आज मार्केट यार्डमध्येही कुणी घ्यायला तयार नसल्याची टीकाही त्यांनी केली.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत आंबा महोत्सव पार पडला. शेतकऱ्यांचे शुद्ध आंबे थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा महोत्सव घेण्यात आला. महोत्सवाला भेट दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती देवानंद पवार यांनी पत्रकार परिषदेत महोत्सवाची पोलखोल केली. ते म्हणाले, तेथे केवळ ४ स्टॉल लागले. त्यातही अमित सरोदे वगळता इतर स्टॉल स्थानिक फळविक्रेत्यांचे होते. वणीचे डॉ. महेंद्र लोढा यांचे दुकान होते, पण ते स्वत: नव्हते तर भास्कर घुटके हा इसम विक्री करीत होता. या महोत्सवाकडे शेतकरी फिरकलेच नाही. शेवटी बळीराजा चेतना अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी काही शेतकऱ्यांना फोन करून बोलावले. त्यातही केवळ आर्णीचे गजानन केसेवार कसेबसे आले. महेश गावंडे, दादाराव कांबळे, दिपाली चिकटे या स्थानिक फळविक्रेत्यांनीच महोत्सवात आंबेविक्री केली, अशी माहिती पवार यांनी दिली.
देवानंद पवार म्हणाले, आंबा महोत्सवाच्या आडून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. केवळ कौतुकासाठी असे भावनात्मक खेळ करू नये. बाजारात आंबे महाग मिळत आहे, अशी कुणाची तक्रार नव्हती. आंबा महोत्सव घेण्यासाठी कुणी निवेदनही दिले नव्हते. तरी व्यापाऱ्यांच्या भल्यासाठी हा महोत्सव घेण्यात आला. पण चौकात शेतकऱ्यांचा कांदा बेभाव विकला जात आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने काय प्रयत्न केले? शेतकऱ्यांचे भले करायचे आहे तर तुरी विकत घ्या, जिल्हाधिकारी तुरीसाठी महोत्सव का घेत नाही? शेतकऱ्यांच्या तुरी घेताना त्याचा सातबारा तपासता आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात व्यापाऱ्यांना कार्बाइडने पिकविलेला आंबा विकू देता, हा कुठला न्याय, असा सवाल देवानंद पवार यांनी उपस्थित केला.