बासरीच्या सुरावटीने रसिकांना मोहित करणारा अवलिया; रोहित वनकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 03:39 PM2020-08-21T15:39:26+5:302020-08-21T15:40:20+5:30
मूळचा वणी येथील रहिवासी असलेल्या रोहितने आजपर्यंत मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध भागात बासरीवादनाचे अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : घरातील सांगितीक वातावरणात मोठं होताना बासरीवादक होण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन तो पुढच्या प्रवासाला निघतो. हा प्रवास तसा सोपा नसतो. आयुष्याच्या वळणावर त्याला अनेक मार्गदर्शक भेटतात. त्यातून तो स्वत:ला परिश्रमपूर्वक घडवत जातो. बासरीवादनातले सारे बारकावे तो शिकत राहतो. आज तो अनेक बड्या गायकांसोबत बासरीची साथसंगत करतो. अनेक चढऊतार पाहत त्याने यशाचा हा पल्ला गाठला आहे. रोहित वनकर असं त्याचं नाव आहे.
मूळचा वणी येथील रहिवासी असलेला रोहित गेली काही वर्षे पुण्यात राहतो. त्याचं कुंटूब यवतमाळात वास्तव्याला आहे. वडिल रमेश वनकर हे उत्तम हार्मोनियम वादक आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच रोहितवर संगीताचे संस्कार झालेत. आपण एक चांगला बासरीवादक व्हायचं, ही खूणगाठ त्याने मनाशी बांधली. वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी पुणे येथे गेला. तेथे त्याने सावित्रीबाई फुले ललित विद्यापिठाच्या ललित कला केंद्रातून बी.ए.संगीत ही पदवी घेतली. तर, भारती विद्यापिठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मींग आर्टमधून एम.ए.(संगीत) ही पदवी घेतली. पंडित राजेंद्र कुळकर्णी (पुणे) यांच्या तालमीत रोहितने बासरीवादनाचे धडे घेतले. तो त्याचे वडिल रमेश वनकर यांना बासरीवादनातील पहिले गुरू मानतो.
रोहितने आजपर्यंत मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध भागात बासरीवादनाचे अनेक कार्यक्रम यशस्वीरित्या केले आहेत. यासोबतच त्याने पं.बिरजू महाराज यांच्यासोबत गानसरस्वती महोत्सवातच बासरी वादन केले. तसेच गायक स्वप्निल बांदोडकर, वैशाली सामंत यांच्या गायकीलाही रोहितने बासरीची साथसंगत केली आहे. या प्रवासात त्याने अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत.