म्हाडा योजनेचे घरही सोडले नाही, पालकमंत्र्यांवर अन्याय झाला कसा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2022 05:00 AM2022-06-26T05:00:00+5:302022-06-26T05:00:19+5:30

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला मोजकीच मंत्रिपदे आली. मात्र, तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमरे यांना कॅबिनेट मंत्री करीत यवतमाळच्या पालकमंत्रिपदाचीही जबाबदारी सोपविली. त्यानंतरही भूमरे यांनी शिवसेनेविरुद्धच्या बंडात सहभाग घेतल्याने शिवसेनेने भूमरे यांना आणखी द्यायचे तरी काय होते, असा प्रश्न  शिवसैनिकांतून उपस्थित केला जात आहे. 

MHADA scheme did not even leave the house, how did injustice happen to the Guardian Minister? | म्हाडा योजनेचे घरही सोडले नाही, पालकमंत्र्यांवर अन्याय झाला कसा ?

म्हाडा योजनेचे घरही सोडले नाही, पालकमंत्र्यांवर अन्याय झाला कसा ?

Next

विशाल सोनटक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाविकास आघाडी सरकारमध्ये काॅंग्रेस-राष्ट्रवादीचीच कामे होतात, आम्हाला डावलले जाते, असे अनेक आरोप करीत यवतमाळचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह सेनेच्या आमदारांनी बंड पुकारत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी गाठले आहे. मात्र इकडे शुक्रवारी पालकमंत्र्यांना औरंगाबादेत लाॅटरी लागली. लोकप्रतिनिधींसाठीच्या दोन टक्के राखीव कोट्यातून भुमरे यांना म्हाडाचे घर मिळाले आहे. शनिवारी शिवसैनिकांत याचीच चर्चा होती. पक्षाने काय कमी केले, म्हणून पालकमंत्र्यांनी शिवसेना सोडली, असा सवाल केला जात आहे. 
वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे यांच्यावर यवतमाळच्या पालकमंत्री पदाची धुरा आली. मात्र केवळ सरकारी कार्यक्रमापुरतेच भुमरे यवतमाळ दौऱ्यावर येत राहिल्याने सुरुवातीपासून त्यांच्याविषयी शिवसैनिकांसह नागरिकांतूनही नाराजीचा सूर उमटत होता. या नाराजीनंतर जनसंपर्काच्या दृष्टीने पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी यवतमाळात संपर्क कार्यालयही थाटले होते. मात्र ते बंदच राहायचे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर पहिल्याच गाडीने भुमरे हे त्यांच्यासोबत गुवाहाटीकडे रवाना झाले होते. शिवसेनेने सर्वकाही देऊनही या ज्येष्ठ नेत्याने पक्ष सोडल्याने यवतमाळात कमालीचा संताप व्यक्त झाला. दरम्यान, संदीपान भुमरे गुवाहाटी मुक्कामी असतानाच शुक्रवारी औरंगाबादेत म्हाडाच्या प्रकल्पाची ऑनलाईन पद्धतीने लाॅटरी निघाली. एक हजार २०४ घरकुलांसाठी ११ हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून कॅबिनेट मंत्री व यवतमाळच्या पालकमंत्री पदाची धुरा खांद्यावर असलेल्या भुमरे यांना अल्प उत्पन्न गटातून घरकुल मिळाले आहे. 
दरम्यान, त्यांनी घरकुलासाठी अर्ज भरला होता की अन्य दुसऱ्या कुणी त्यांच्या नावे अर्ज केला, हे तपासण्यात येईल आणि पात्र असतील तर त्यांना घरकुल दिले जाईल, असे म्हाडाच्या सीईओंनी स्पष्ट केले आहे. मात्र या लाॅटरीनंतर शिवसैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांनीही भुमरे यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. पालकमंत्र्यांनी म्हाडाचे घरही सोडले नाही, अशी टीका अनेकांनी केली  आहे.

शिवसैनिक म्हणतात; सेनेने काय कमी केले? 
- संदिपान भूमरे हे एकेकाळी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात स्लीप बाॅय म्हणून काम करीत होते. पुढे शिवसेनेत सक्रिय झाल्यानंतर, ते याच कारखान्याचे चेअरमन झाले. एवढेच नव्हे तर १९९५, १९९९, २००४, २०१४ आणि २०१९ असे तब्बल पाच वेळा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. 
- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला मोजकीच मंत्रिपदे आली. मात्र, तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमरे यांना कॅबिनेट मंत्री करीत यवतमाळच्या पालकमंत्रिपदाचीही जबाबदारी सोपविली. त्यानंतरही भूमरे यांनी शिवसेनेविरुद्धच्या बंडात सहभाग घेतल्याने शिवसेनेने भूमरे यांना आणखी द्यायचे तरी काय होते, असा प्रश्न  शिवसैनिकांतून उपस्थित केला जात आहे. 

महागावमध्ये शनिवारी दोन ठिकाणी निदर्शने 
- शिवसेनेत बंडाळी करून गुवाहाटीमध्ये ठाण मांडून बसलेल्या बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ शनिवारी महागाव शहरातील नवीन बसस्थानक आणि जुने बसस्थानक अशा दोन ठिकाणी शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे यांनी तालुका उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे सांगितले. 
- नवीन बसस्थानकासमोर झालेल्या आंदोलनात युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विशाल पांडे यांच्यासह दत्तराम कदम, किशोर घाटोळे, लक्ष्मीबाई पारवेकर, राम तंबाखे, नगराध्यक्ष करुणा शिरबिरे, रामराव नरवाडे, सुजित ठाकूर, लखन राठोड, कैलास पाटे, अनिता डोंगरदिवे, जयश्री चव्हाण, सुनीता डाखोरे, आकाश राठोड, बालूसिंग जाधव आदी शिवसैनिक सहभागी झाले होते. तर माजी उपजिल्हा प्रमुख सुदाम खंदारे, चक्रधर गोटे, सतीश नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली जुन्या बसस्थानकासमाेर झालेल्या आंदोलनात ग्यानबा नावाडे, अशोक तुमवार, संदीप राऊत, गोविंदा धनगर आदी सहभागी झाले होते.

 

Web Title: MHADA scheme did not even leave the house, how did injustice happen to the Guardian Minister?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.