एमआयडीसीतील उद्योग धोक्यात
By admin | Published: July 3, 2014 11:49 PM2014-07-03T23:49:15+5:302014-07-03T23:49:15+5:30
येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा वीज पुरवठा मार्लेगाव फिडरवरून होत असल्याने वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने उद्योग धोक्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तासंतास
वीज पुरवठा वारंवार खंडीत : वीज वितरण कंपनीचे चुकीचे धोरण
अविनाश खंदारे - उमरखेड(कुपटी)
येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा वीज पुरवठा मार्लेगाव फिडरवरून होत असल्याने वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने उद्योग धोक्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तासंतास वीज पुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र वीज वितरण कंपनी याकडे लक्ष द्यायला तयार नाही.
उमरखेड येथे एमआयडीसीची स्थापना २५ वर्षांपूर्वी करण्यात आली. अनेकांनी याठिकाणी उद्योग उभारले. त्यामध्ये पांढरा कोळसा तयार करणे, टायर रिमोल्ड, दालमिल, प्लास्टिक, दुध डेअरी, आॅईल मिल यासह विविध उद्योगांचा समावेश आहे. उद्योजकांनी लाखो रुपये खर्च करून उद्योगाची उभारणी केली. अनेकांनी बँकांचे कर्ज घेतले. उद्योग व्यवस्थित चालून भरभराट होईल, असे स्वप्न पाहात आहे. मात्र या स्वप्नांना वीज वितरण कंपनी तडा देत आहे. एमआयडीसीचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे उद्योग ठप्प झाले आहे. येथील उद्योजकांनी चौकशी केली तेव्हा भलताच प्रकार पुढे आला. एमआयडीसीला होणारा वीज पुरवठा ग्रामीण भागातील मार्लेगाव फिडरवरून केला जातो. त्यामुळे लहानसहान दोष निर्माण होवून वीज पुरवठा खंडित होतो. परंतु वीज वितरणचे अधिकारी दुरुस्तीसाठी येत नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून उद्योजकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. वारंवार निवेदने दिली. परंतु कुठलीही भूमिका वीज वितरणने घेतली नाही. विजेच्या लपंडावाने लाखो रुपयांची मशिनरीही निकामी होण्याची भीती असते. उद्योग बंद असल्याने याठिकाणी काम करणाऱ्यांवरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास येथील उद्योग बंद करावे लागतील, अशी भीती व्यक्त होत आहे. गुरुवारी येथील व्यापाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला पुन्हा निवेदन देवून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. यावेळी जितेंद्र वर्मा, संदीप ठाकरे, अमोल उदावंत, मिनाजभाई यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. यावेळी या व्यापाऱ्यांनी वीज वितरण कंपनीबद्दल रोष व्यक्त केला.