एमआयडीसीतील भूखंड जप्तीच्या मार्गावर
By admin | Published: April 6, 2017 12:30 AM2017-04-06T00:30:19+5:302017-04-06T00:30:19+5:30
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योग संजिवनी योजना २०१५ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील भूखंडधारकांना
अविकसित भूखंड निशाण्यावर : ३० एप्रिलर्यंत संजीवनी योजनेला दिली मुदतवाढ
यवतमाळ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योग संजिवनी योजना २०१५ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील भूखंडधारकांना ३० एप्रिल २०१७ पर्यंत संजिवनी दिली आहे. या दरम्यान या योजनेचा लाभ न घेतल्यास जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रातील भूखंडांवर जप्तीची कारवाई निश्चित आहे. सध्या एमआयडीसीच्या ५० ते ५५ भूखंडांवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार आहे.
दरम्यान एमआयडीसी क्षेत्रातील ज्या भूखंडधारकांनी बांधकाम पूर्ण करून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला प्राप्त करून घेतला नाही तथा ३० एप्रिल पर्यंत दाखला प्राप्त करून घेणार नाहीत, तसेच उत्पादनात गेल्याचे पुरावे सादर करणार नाहीत, असे भूखंड आहे त्या स्थितीत महामंडळाकडे वर्ग होतील. आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात ८३ भूखंडधारकांना संजिवनी योजनेचा लाभ देण्यात आला आहे. मात्र अद्याप ५० ते ५५ भूखंडधारकांनी अटी व शर्ती पूर्ण केलेल्या नाहीत.
संजिवनी योजनेनुसार उद्योग सुरू करण्यासाठी भूखंडधारकांना ही शेवटची संधी असून ३० एप्रिल २०१७ पर्यंत बांधकाम पूर्ण करून ते केल्याचा दाखल प्राप्त करून घ्यावा व उत्पादनात जावे किंवा १ मे रोजी भूखंड मोकळा करावा, असे एमआयडीसीकडून सबंधित भूखंडधारकांना ठणकविण्यात आले आहे. यामुळे भूखंडधारक धास्तावले आहे. (प्रतिनिधी)