एमआयडीसीचे प्लॉट वर्षानुवर्ष रिकामे; किती प्लॉट वितरीत झाले? यवतमाळ कार्यालयाकडे माहिती नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 06:18 PM2024-12-03T18:18:59+5:302024-12-03T18:20:01+5:30
Yavatmal : किती प्लॉटवर उद्योग? यवतमाळचे कार्यालय म्हणते, अमरावतीहून माहिती घ्या
रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक औद्योगिक वसाहतीमध्ये जुनी औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणचे अनेक उद्योग बंद आहेत. सी झोनमधील सर्व १५० प्लॉट उद्योगासाठी बुक झाल्याचे सांगितले जाते. या प्लॉटला तारेचे कुंपण टाकून जागा ताब्यात घेतल्याचे दिसते. प्रत्यक्षात यातील अनेक प्लॉटवर उद्योगच आले नाहीत. नेमके किती प्लॉट वितरीत झाले? आणि त्यातील किती प्लॉटवर उद्योग सुरु आहेत. याची माहिती औद्योगिक विकास महामंडळाच्या यवतमाळ येथील कार्यालयाकडेही उपलब्ध नाही. या माहितीसाठी हे कार्यालय अमरावती विभागीय कार्यालयाकडून माहिती घेण्यास सांगते.
यवतमाळ सारख्या मागास भागात उद्योग वाढून तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने ज्येष्ठ स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या पुढाकाराने १९८० मध्ये येथे औद्योगिक वसाहत सुरु झाली. त्यावेळी जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये १० युनिट होते. यानंतर भोयर एमआयडीसी झाली. त्यात ७० युनिट होते. यातील अर्धे अधिक युनिट आज बंद पडले आहेत, तर २०१७ मध्ये सी झोन तयार झाले. त्यासाठी ८५ हेक्टर जागा निश्चित झाली. त्यावरचे १५० प्लॉट बुक झाले. मात्र त्यातील केवळ ४० प्लॉटवर उद्योग आले. त्यातीलही अनेक उद्योग आता बंद पडले असून उद्योग मोजके सुरू झाले. काही खुले प्लॉट आजही जैसे थे पडून आहेत. औद्योगिक विकास महामंडळाच्या नियमा नूसार प्लॉट अलॉट झाल्या नंतर पाच वर्षात त्या ठिकाणी काम न झाल्यास ते प्लॉट परत घेतले जातात. यासंदर्भात उद्योजकांनी आणखी पाच वर्षांची सवड मागितल्याचे समजते, मात्र त्यावर धोरणात्मक निर्णय अद्यापही झालेला नाही. मात्र ज्यांना प्लॉट दिले. त्यांना उद्योग सुरु करण्याचे गांभीर्य नाही. आणि ज्यांना उद्योग सुरु करायचेत त्यांना प्लॉट मिळत नाही. अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहत सुरु करण्याच्या मुळे उद्देशालाच नख लागले आहे.
टेक्सटाइल पार्कला ९३.५२ हेक्टर जागा
यवतमाळ हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी कापडावर आधारीत उद्योग, किवा प्रक्रिया उद्योग येतील म्हणून ९३ हेक्टरवर टेक्सटाइल पार्क खुले ठेवण्यात आले. प्रत्यक्षात उद्योग पाहिजे तसे आले नाहीत. यामुळे तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे ही जागा फुड पार्क करिता रिझर्व्ह करण्याची विनंती झाली. त्यांनी एक वर्षात अर्ज करण्याची सवलत देत ही जागा फुड पार्कला दिली. मात्र, फुड पार्कसाठीही कोणी पुढाकार घेतला नाही.