प्रवासी तरूणी आयसोलेशन वॉर्डात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:00 AM2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:00:37+5:30

एक युवती लॉकडाऊनमध्ये कल्याण येथे अडकून पडली होती. ती १६ मे रोजी चंद्रपूर येथील काही व्यक्तींसोबत टेम्पोने आपल्या गावी पोहोचली. कल्याणवरून दोन गाड्यांनी आलेली ही मंडळी युवतीला मिरा येथे सोडून पुढे चंद्रपुरला निघून गेली. परंतु यांपैकी चंद्रपूर येथील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला.

Migrant girl in isolation ward | प्रवासी तरूणी आयसोलेशन वॉर्डात

प्रवासी तरूणी आयसोलेशन वॉर्डात

Next
ठळक मुद्देचंद्रपूर कनेक्शन : कल्याणवरून टेम्पोने पोहोचली होती गावात

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : कल्याणवरून तालुक्यातील मिरा येथे आलेल्या एका युवतीला चंद्रपूर येथील एका पॉझीटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे रविवारी रात्री ९ वाजता येथील आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले. यापूर्वीही वणी तालुक्यातील उमरी येथील दोन संशयीत महिलांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आली.
येथील एक युवती लॉकडाऊनमध्ये कल्याण येथे अडकून पडली होती. ती १६ मे रोजी चंद्रपूर येथील काही व्यक्तींसोबत टेम्पोने आपल्या गावी पोहोचली. कल्याणवरून दोन गाड्यांनी आलेली ही मंडळी युवतीला मिरा येथे सोडून पुढे चंद्रपुरला निघून गेली. परंतु यांपैकी चंद्रपूर येथील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. त्यामुळे या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व सहप्रवाशांचा शोध घेऊन त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. याच पार्श्वभूमीवर पांढरकवडा तालुक्यातील सदर युवतीलाही येथील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले. या युवतीला कोरोनाची कोणतीही लक्षणे नसून दक्षता घेण्याच्या दृष्टीने तिला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
७ मेनंतर देशाच्या विविध भागात अडकून पडलेल्या नागरिकांना आपापल्या गावी परत जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर पांढरकवडा तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर घरवापसी सुरू झाली आहे. पुणे, मुंबई या सारख्या कोरोनाचा प्रादूर्भाव असलेल्या शहरातून मोठ्या संख्येने नागरिक पांढरकवडा तालुक्यातील आपापल्या गावात परत येत आहेत. त्यामुळे प्रशासनावरील ताण वाढला आहे. सर्वांना होमक्वारंटाईन केले जात आहे. मात्र हे लोक प्रामाणिकपणे होम क्वारंटाइन राहतील का, हा प्रश्न गंभीर झाला आहे.

संशयीत रूग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था
संशयीत कोरोना रूग्णांसाठी पांढरकवडात चार ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून उपजिल्हा रूग्णालयात अशा प्रकारची व्यवस्था नाही, तर ती ट्रामा केअर युनीटमध्ये आहे. उपजिल्हा रूग्णालयाचा बाह्य रूग्ण विभाग व आंतर रूग्ण विभाग नेहमीप्रमाणेच सुरू असून रूग्णांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय तोडासे व डॉ.वैशाली सातुरवार यांनी केले आहे.

Web Title: Migrant girl in isolation ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.