सोयाबीन पिकावर लष्करी अळीचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 05:00 AM2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:00:10+5:30
गेल्या सप्ताहात सतत दहा दिवस पाऊस कोसळला. सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीनसह मूग, उडीद आणि कापूस पिकाला फटका बसला. सोयाबीनवर लष्करी अळीचे आक्रमण झाले. ही अळी पानांवर बसून छिद्र पाडत आहे. सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. सोयाबीनचे उभे पीक डोळ्यादेखत नष्ट होत असल्याने शेतकरी काळजीत पडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्यात गेल्या सप्ताहात सतत पाऊस झाला. या पावसामुळे सोयाबीनवर लष्करी अळीने हल्ला केला. यामुळे सोयाबीनचे नुकसान होत असल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताक्रांत झाले आहे.
गेल्या सप्ताहात सतत दहा दिवस पाऊस कोसळला. सततच्या पावसामुळे खरिपातील सोयाबीनसह मूग, उडीद आणि कापूस पिकाला फटका बसला. सोयाबीनवर लष्करी अळीचे आक्रमण झाले. ही अळी पानांवर बसून छिद्र पाडत आहे. सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे खरीप पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. सोयाबीनचे उभे पीक डोळ्यादेखत नष्ट होत असल्याने शेतकरी काळजीत पडले आहे. तालुक्यात सोयाबीनसह कापूस, मूग, उडीद आणि हळदीचेही मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. यावर्षी कापूस आणि सोयाबीनची जादा लागवड करण्यात आली. मात्र आता पिकावर अळीने हल्ला केल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहे.
सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. अनेकांच्या शेतात सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. मात्र शेतकऱ्यांनी आर्थिक तजवीज करून दुबार पेरणी केली. आता पीक ऐन जोमात असताना अतिपावसाने दगा दिला. अनेक शेतांमध्ये सर्वत्र पाणी साचले. यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक संकटात सापडले आहे.
तालुक्यात सर्वत्र दहा दिवस सतत पाऊस सुरू असल्याने लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या अळीमुळे सोयाबीन पिवळे पडत आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासनाने शेताच्या बांधावर जावून पिकांची पाहणी करावी आणि नुकसानग्रस्त शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. शेतकºयांना लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.
महागाव तालुक्यात शेंगा गळाल्या
महागाव : तालुक्यात घोनसरा परिसरात अनेक शेतांमधील सोयाबीन शेंगा गळत आहे. सततच्या पावसामुळे पीक अडचणीत आले आहे. जमिनीतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने कपाशीची मुळेही ढिली होत आहे. कपाशीवर पांढरी माशी व तुडतुडे आणि बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. जमीन चिबडल्याने सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद यांच्यासह भाजीपाला आणि फळवर्गीय पिकांवर विविध किटकांचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे महागाव तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले आहे.