Maharashtra Election 2019; राजकारण तापले, महाग दूध आटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 09:39 PM2019-10-12T21:39:03+5:302019-10-12T21:44:39+5:30
उमेदवारांनी गावागावात कोजागिरीचे दुध घोटण्याचे ठरविले आहे. या ठिकाणी सभा आणि प्रचारासाठी उमेदवार स्वत: पोहचणार आहेत. तर काही ठिकाणी कार्यकर्तेच स्थानिक पातळीवर कोजागिरी साजरी करून उमेदवाराला निवडूून आणण्याचे आवाहन करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निवडणुकीने वातावरण तापलेले असतानाच आता रविवारी कोजागिरीचे दुध तापवून आटवले जाणार आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत आलेली कोजागिरी ही कार्यकर्त्यांसाठी चालून आलेली संधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठी राजकीय पक्षांनी गावोगावी कोजागिरीचे कार्यक्रम ठेवले आहेत. यातून बाजारात दुधाची मागणी अचानक वाढली आहे. दुधाचे दरही भडकले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दुध मिळणे दुरापास्त झाले आहे.
कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी प्रत्येक पक्ष आटोकाट प्रयत्न करीत आहे. रात्रीच्या जेवणावळी आणि बार हाऊसफुल्ल आहेत. अशात कोजागिरीचा सणही आला आहे. यामुळे उमेदवारांनी गावागावात कोजागिरीचे दुध घोटण्याचे ठरविले आहे. या ठिकाणी सभा आणि प्रचारासाठी उमेदवार स्वत: पोहचणार आहेत. तर काही ठिकाणी कार्यकर्तेच स्थानिक पातळीवर कोजागिरी साजरी करून उमेदवाराला निवडूून आणण्याचे आवाहन करीत आहेत.
यासाठी आजपर्यंत गावात लागले नसेल इतके दुध मागविण्यात आले आहे. या दुधाच्या बुकिंगमुळे दुध संकलन केंद्राजवळ दुध शिल्लक राहिलेले नाही. काही केंद्रांनी दुध नाही असे बोर्डही लावले आहे. तर अनेकांनी दुधाचे दर वाढविले आहे. एरवी ४० ते ४८ रूपये लिटर असणारे दुध कोजागिरीला ६० ते ७० रूपये लिटर झाले आहे.
परजिल्ह्यातून येणारे पाकीटही दुरापास्त
गावामधील संकलन केंद्रातील दुध रविवारी यवतमाळात पोहचण्यापूर्वीच खरेदी करण्यात आले आहे. यामुळे परजिल्ह्यातून येणारे पॉकेटचे दुध मिळावे म्हणून राजकीय पक्षांनी एजंटांशी संपर्क केला. मात्र या ठिकाणीही दुधाचा तुटवडा आहे.
सर्वसामान्यांच्या कोजागिरीला महागाईचे ग्रहण
राजकीय कार्यकर्त्यांच्या गोंधळाने कोजागिरीला घोटले जाणारे दुध महागले. त्यामुळे सर्वसामान्यांना कोजागिरीच्या पावन पर्वावर दुध घोटताच येणार नाही. यामुळे अनेकांना कोजागिरीचा बेत पुढे ढकलावा लागणार आहे.