२५ हजारांवर कुटुंबाच्या दारी पोहोचणार दूधगंगा

By Admin | Published: August 14, 2016 12:45 AM2016-08-14T00:45:55+5:302016-08-14T00:45:55+5:30

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी विविध प्रयोग शासनस्तरावरून सुरू आहे.

MilkGanga will reach family door for 25 thousand | २५ हजारांवर कुटुंबाच्या दारी पोहोचणार दूधगंगा

२५ हजारांवर कुटुंबाच्या दारी पोहोचणार दूधगंगा

googlenewsNext

४०० युवकांना रोजगार : पुसद, उमरखेड, महागावात संकलन
सुरेंद्र राऊत यवतमाळ
जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी विविध प्रयोग शासनस्तरावरून सुरू आहे. खऱ्या अर्थाने आता श्वेतगंगा अवतरणार असून वल्साड मिल्क युनियनने पुसद येथील शासकीय दूध डेअरी प्लांट चालविण्यास घेतला आहे. यातून २५ हजार शेतकरी कुटुंबांना दुग्ध व्यवसायातून हक्काचा रोजगार मिळणार आहे. वार्षिक २०० कोटींची उलाढाल खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये सुबत्ता आणणारी ठरणार आहे.
वल्साड मिल्क युनियनचा अमूल दूध हा ब्रॅन्ड आहे. या युनियनने उमरखेड, महागाव, पुसद या तालुक्यांमध्ये दूध संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्याचा यशस्वी प्रयोग राबविला आहे. सध्या या तीन तालुक्यांमधून महिन्याकाठी पाच कोटीची उलाढाल होत आहे. अमूल थेट शेतकऱ्यांच्या घरून दूध खरेदी करत असल्याने बसल्या जागेवर दुधाचा व्यवसाय होत आहे. अमूलची दूध प्रक्रिया क्षमता आणि उमरखेड, महागाव, पुसद येथे झालेला यशस्वी प्रयोग पाहता राज्य शासनाने स्वत:हून पुसद येथील शासकीय डेअरी वल्साड मिल्क युनियनला चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला.
पुसदच्या प्लांटमध्ये प्राथमिकस्तरावर ५० हजार लिटर दुधावर प्रक्रिया केली जाणार आहे. सुरुवातीला येथे किमान ४०० कर्मचाऱ्यांना रोजगार मिळणार आहे. या प्लांटची क्षमता दोन लाख दुधावर प्रक्रिया करण्यापर्यंत वाढविता येणे शक्य आहे. ज्यातून वर्षाला शेकडो कोटीचे उत्पादन मिळेल. शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय उभा करता येणार आहे. यासाठी अमूलकडून शेतकऱ्यांना दर्जेदार पशुखाद्य पुरविले जाणार आहे. अधिकाधिक चांगल्या दर्जाचे दूध उत्पादन करता यावे याकरिता अमूलकडूनच प्रचार प्रसिद्धी केली जाणार आहे. उमरखेड, महागाव, पुसद या तालुक्यातील गावागावात मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन घेतले जात आहे. शाश्वत खरेदीदार अमूलच्या रूपाने मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसोबतच दुधाच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या बँक खात्यात महिन्याकाठी आॅनलाईन रक्कम जमा केली जाते. यामुळे खऱ्या अर्थाने श्वेतक्रांती झाल्याचे दिसून येत आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकर, वल्साड मिल्क युनियनचे मॅनेजर कुलकर्णी, वल्साड मिल्कचे प्रोड्युसर हेड एच.बी. सिंग, डेअरीचे सेके्रेटरी विजयकुमार सहाय, प्लांट इन्चार्ज रूपेश आडे आदी या बैठकीला उपस्थित होते.
शासनाने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील दूध संकलनाची जबाबदारी आणि पुसद येथील शासकीय डेअरी प्लांट वल्साड मिल्क युनियनला देण्याचे मान्य केले आहे. मात्र या संदर्भातला अधिकृत करार झालेला नाही. कुठल्या कुठल्या अटी शर्तीवर हा दूध प्लांट व संकलन करण्यास परवानगी दिली जाते हेही महत्त्वाचे ठरणार आहे. एकट्या पुसद येथील प्लांटमध्येच संपूर्ण जिल्ह्यातून गोळा झालेल्या दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता असल्याची प्लांट इन्चार्ज रूपेश आडे यांनी सांगितले.

कर्जासाठी बँकाच फिरणार
४अमूलने शेतकऱ्यांकडून दूध संकलन करण्यास सुरुवात केल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची महिन्याची बॅलेंस शिट तयार होईल. आज शेतकऱ्यांना कुठल्याही कर्जासाठी बँकांकडून प्रतिसाद दिला जात नाही. मात्र दुधाच्या व्यवसायातून नियमित उत्पन्नाची क्षमता निश्चित झाल्यानंतर स्वत:हूनच बँका कर्ज देण्यास पुढे येतील. हा बदलही उमरखेड, महागाव, पुसद येथे काही प्रमाणात पहावयास मिळत आहे. उन्हाळ्यात निर्माण होणारा चारा आणि पाण्याचा प्रश्न यामुळे दुधाळ जनावरेही विकली जातात. मात्र पुढील काळात ही परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी दक्षता घेतली जाणार आहे. प्रशासनाकडूनही तसा प्रयत्न राहणार आहे.

 

Web Title: MilkGanga will reach family door for 25 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.