खेळाडू कर्मचाऱ्यांचा लाखोंचा जुगार मॅनेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 09:49 PM2018-02-04T21:49:05+5:302018-02-04T21:54:35+5:30
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : येथील नेहरू स्टेडियम संकुलात सुरू असलेल्या जुगारावर रविवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली. त्यातून मोठी रक्कम हस्तगत करून २७ खेळाडू कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र प्रत्यक्ष कारवाईत केवळ आठ जणांचीच नावे रेकॉर्डवर आली असून जप्त केलेली रक्कमही केवळ दहा हजारच दर्शवून लाखो रूपये पोलिसांनी दडपल्याची चर्चा आहे.
येथील नेहरू स्टेडियमवर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा सुरू आहे. त्यासाठी जिल्हाभरातून शिक्षक व कर्मचारी आले आहेत. शुक्रवारी स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेसाठी जिल्हाभरातून आलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षकांचा नेहरू स्टेडीयम संकुलात मुक्काम आहे. येथे कर्मचाºयांचा मेळ जमल्यानंतर जुगाराचा डावही रंगतो, हे सर्वश्रृत आहे. हाच धागा पकडून रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास पोलीस पथकाने तेथे धाड टाकली. यावेळी जुगार चांगलाच रंगात आला होता. पोलिसांना या डावातूनच हारलेल्या एकाने टीप दिली होती. त्यावरून हा जुगार रंगेहात पकडण्यात आला.
जुगार खेळताना किमान ३० ते ४० जण उपस्थित होते. खेळणाऱ्यांमध्ये २७ जणांचा समावेश होता. सर्व कर्मचारी असल्याने डावातील रक्कमही लाखोंच्या घरात होती. मात्र ऐनवेळी पोलिसांची धाड पडल्याने सर्वांची तारांबळ उडाली. ‘इन कॅमेरा’ कारवाई सुरू असल्याचे भासविण्यात आले. एवढेच नव्हे, तर काही माध्यमांचे प्रतिनिधीही आमच्या सोबत आहे, असेही या खेळाडू कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे सर्वांचीच घाबरगुंडी उडाली. नसती आफत नको म्हणून बोलणी सुरू झाली. अखेर विनोद रमाकांत शर्मा (रा. धर्माजीनगर, वडगाव), रामू कर्णू पेंदोर (रा. टिटवी, घाटंजी), विकास मधुकर पारखी (रा. संकटमोचन), बळवंत दादाराव राऊत (दत्त चौक, अमराईपुरा) या चौघांना रेकॉर्डवर घेत आठ हजारांची रक्कम जप्त झाल्याचे दाखविण्यात आले.
या जुगाराच्या गुन्ह्यात नाव रेकॉर्डवर येऊ नये, यासाठी अनेकांनी मोठी रक्कम मोजली आहे. ३० ते ३५ हजार रुपये प्रत्येकी देऊन प्रकरण निस्तारण्याचे प्रयत्न करण्यात आले. यापूर्वीही अवधुतवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मोठे वडगाव परिसरातील बंड्यावरची मोठी जुगार ‘रेड’ काही हजारातच दडपण्यात आली. दिवसेंदिवस या ठाण्यातील असे प्रकार वाढीस लागले आहे. पूर्वी नेहमीच अशा घटना होत असल्याने वरिष्ठ स्तरावरून चौकशीही झाली होती. त्यानंतर काही दिवस हा प्रकार थांबला होता. आता नेहरू स्टेडियमच्या जुगार धाडीनंतर पुन्हा हा प्रकार सुरू झाल्याचे दिसून येते.
रविवारी कर्मचारी पतसंस्थेत
जुगाराच्या गुन्ह्यात नाव येऊ नये, यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी गोदणी रोडवरील पतसंस्थेत धाव घेतली. रविवार असूनही पतसंस्थेत चांगलीच वर्दळ होती. पतसंस्थेतून वैयक्तिक कर्ज घेऊन प्रकरण निस्तारण्याचा खटाटोप अनेक कर्मचारी करीत होते.