भुलाई येथे २० गुंठ्यात लाखोंचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:25 PM2019-01-21T22:25:39+5:302019-01-21T22:26:38+5:30
भुलाई येथील एका शेतकऱ्याने केवळ २0 गुंठे क्षेत्रात एक लाख रुपयांचे अॅपल बोरांचे उत्पन्न घेतले. या हंगामी फळासोबतच त्यांनी सोयाबीनचे आंतरपीकसुद्धा घेतले. कमी जागेत चांगले उत्पन्न घेण्याच्या त्यांच्या प्रयोगाचे कौतुक होत आहे.
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : भुलाई येथील एका शेतकऱ्याने केवळ २0 गुंठे क्षेत्रात एक लाख रुपयांचे अॅपल बोरांचे उत्पन्न घेतले. या हंगामी फळासोबतच त्यांनी सोयाबीनचे आंतरपीकसुद्धा घेतले. कमी जागेत चांगले उत्पन्न घेण्याच्या त्यांच्या प्रयोगाचे कौतुक होत आहे.
अनंतकुमार रामराव गोरले, असे या युवा शेतकऱ्यांचे नाव आहे. त्यांच्याकडे केवळ तीन एकर शेती आहे. पारंपारिक पिकांपासून चांगले उत्पन्न मिळत नाही. कुटुंबाच्या वाढलेल्या गरजा भागविता येत नाही. त्यामुळे त्यांनी शेतात वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली. यातून त्यांना नातेवाईकाकडून अॅपल बोरांची माहिती मिळाली. नंतर ४० रुपये प्रति दराने २०० रोपे आणली. त्यांची २० गुंठे जागेत लागवड केली. रोपांचे संगोपन केल्यानंतर चार महिन्यांत झाड तयार होऊन त्याला बोरे लागली. आठ महिन्यांच्या कालावधीत एका झाडापासून त्यांना ३५ ते ४० किलो बोरांचे उत्पन्न मिळाले. एका किलोला किरकोळ विक्रीतून ३०, तर ठोक विक्रीतून २२ रुपये मिळाले. यातून खर्च वजा जाता त्यांना एक लाखाचे उत्पन्न झाले.
हंगाम संपला की झाडांची कटाई करून त्याचा कुंपणाकरिता उपयोग होतो. यात झाडे विक्रीतून पैसे मिळतील. बोरांच्या झाडाला २५ ते ३० वर्षे फळे येतात. पुढील वर्षी लागवडीचा खर्च न येता उत्पन्न मिळते. त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांना अत्यंत फायदेशीर असल्याचे अनंतकुमार यांनी दाखवून दिले. कमी जागा व कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळू शकते, हे त्यांनी सिद्ध केले.
युवा शेतकऱ्याची जिद्द वाखाणण्याजोगी
गोरले यांच्याजवळ केवळ तीन एकर शेती आहे. तेवढ्याच जागेत खरीपात कापूस, सोयाबीन, तर रबी हंगामात हरभरा, गहू पेरला जातो. आता अॅपल बोरे, भाजीपाला असे वेगवेगळे प्रयोग करून बाराही महिने उत्पन्न घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जिद्द आणी मेहनतीने यात चांगले यश मिळत आहे. शेतमाल तसेच फळांचे बाजारात चांगले भाव असले तरी शेतकºयांना आपला माल ठोक पद्धतीने व्यापाऱ्यांना बेभाव विकावा लागतो. त्यामुळे अनंतकुमार यांनी दारव्हा-कारंजा मार्गावर असणाºया आपल्या शेतातच दुकान टाकून स्वत: बोराची विक्री केली. त्यांना ३0 रुपये किलोचा भाव मिळाला.