पोषण आहाराच्या भांडे खरेदीत लाखोंचा घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 09:33 PM2017-09-12T21:33:21+5:302017-09-12T21:33:21+5:30
विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे थेट बँकेतच देणाºया जिल्हा परिषदेने शालेय पोषण आहाराच्या भांड्यांचे पैसे मात्र आधी बँकेत टाकले, नंतर काढून घेतले. पैशांऐवजी भांडेच दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे थेट बँकेतच देणाºया जिल्हा परिषदेने शालेय पोषण आहाराच्या भांड्यांचे पैसे मात्र आधी बँकेत टाकले, नंतर काढून घेतले. पैशांऐवजी भांडेच दिले. मात्र भांडे देताना शाळेच्या नावाने एका विशिष्ट प्रतिष्ठानाच्या कच्च्या पावत्या मुख्याध्यापकाच्या हातावर टिकविल्या. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात लाखोंचा घोळ झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक शाळांना पोषण आहार शिजविण्यासाठी भांडे खरेदीचे आदेश देण्यात आले होते. नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ मध्ये त्यासाठी प्रत्येक शाळेला ९६५ रुपयांचा निधी देण्यात आला होता. हा निधी थेट मुख्याध्यापकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला होता. त्यातून शाळा स्तरावर व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी भांडे खरेदी करावे, असा मूळ आदेश होता. मात्र, पैसे बँकेत गेल्यानंतर काही दिवसातच सध्याच भांडे घेऊ नका, बँकेतून पैसू काढू नका, अशा तोंडी सूचना देण्यात आल्या, अशी माहिती मुख्याध्यापकांनी दिली.
या सूचनेनंतर पैसे असूनही शाळांमध्ये पोषण आहार ठेवण्याचे भांडे खरेदीच करण्यात आले नाही. आता तब्बल आठ महिने उलटल्यानंतर जिल्हा परिषदेला या पैशांची अचानक आठवण झाली. जिल्हा स्तरावरून पुन्हा मुख्याध्यापकांना तोंडी सूचना देण्यात आल्या. लवकरच तुमच्या शाळांना थेट जिल्हास्तरावरून भांडे देण्यात येईल. ते येऊन घेऊन जा, असे सांगण्यात आले.
मुख्याध्यापकांनी प्रत्यक्ष भांडे पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. भांड्यांची क्वालिटी बघता, ९६५ रुपयांचा व्यवहार ४०० रुपयांतच गुंडाळल्याची शंका आली. एकदा भांडेखरेदीसाठी पैसे दिलेले असताना नंतर प्रत्यक्ष भांडेच का दिले, याबाबत मुख्याध्यापकांमध्ये शंकाकुशंका व्यक्त करण्यात येत आहे.
‘छापील’ मोजमापांमुळे ‘मॅनेज’ पावतीवर शंका
बँकेत पैसे दिल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी ते पैसे घेऊन मुख्याध्यापकांना जिल्हास्तरावर बोलावण्यात आले. ते पैसे घेऊन त्यांना ठराविक भांडे देण्यात आले. त्याबदल्यात वीर वामनराव चौकातील एका प्रतिष्ठानाच्या पावत्यांवर शाळेचे नाव लिहून मुख्याध्यापकांना देण्यात आल्या. या पावत्या कच्च्या असल्याने ‘आॅडिट’मध्येही मान्य होण्याची शक्यता नाही. शिवाय, पावतीवर मोठा दंड गोलाकृती डबा (क्षमता ५ लिटर), मध्यम दंड गोलाकृती डबा (क्षमता १.६ लिटर), लहान दंड गोलाकृती डबा (क्षमता १ लिटर), तेल केटली (क्षमता २.५० लिटर) असा ‘टिपिकल’ कार्यालयीन उल्लेख छापील स्वरुपात देण्यात आला आहे. त्यामुळे या कच्च्या पावत्या आधीच ‘मॅनेज’ करण्यात आल्याची शंका मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहे.