लाखो रूपयांचा कापूस आगीत भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 06:00 AM2020-02-19T06:00:00+5:302020-02-19T06:00:25+5:30
या आगीत ३० ते ४० लाख रूपयांचा कापूस जळाल्याचा प्राथमिक अंदाज जिनिंगचे संचालक आरिफ कादर यांनी व्यक्त केला आहे. या जिनिंगमध्ये सीसीआयनेदेखील आपला कापूस मोठ्या प्रमाणावर ठेवला आहे. जिनिंगमध्ये मंगळवारी कापूस खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचीही मोठी गर्दी होती. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास अहेफाज जिनिंगच्या मालकीच्या कापूस गंजीला अचानक आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील निळापूर-ब्राम्हणी मार्गावर असलेल्या अहेफाज जिनिंगमध्ये मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास कापसाच्या गंजीला अचानक आग लागली. पाहता-पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. त्यात लाखो रूपयांचा कापूस जळून खाक झाला.
विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यात अहेफाज जिनिंगमध्ये आगीची ही दुसरी घटना आहे. दरम्यान, याप्रकरणी जिनिंग संचालकाने सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. या आगीत ३० ते ४० लाख रूपयांचा कापूस जळाल्याचा प्राथमिक अंदाज जिनिंगचे संचालक आरिफ कादर यांनी व्यक्त केला आहे. या जिनिंगमध्ये सीसीआयनेदेखील आपला कापूस मोठ्या प्रमाणावर ठेवला आहे. जिनिंगमध्ये मंगळवारी कापूस खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचीही मोठी गर्दी होती. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास अहेफाज जिनिंगच्या मालकीच्या कापूस गंजीला अचानक आग लागली. गंजीतील कापूस बेल्टद्वारे रेचाकडे नेण्यात येत असताना तेथे ठिणगी पडली. त्यातून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे आकाशात धुरांचे लोट दिसू लागले. त्यामुळे वणी शहरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जिनिंग मालकाने तातडीने अग्नीशमन विभागाला आगीची माहिती देताच, पालिकेचे अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीची भीषणता पाहून आणखी एक बंब मागविण्यात आला. मात्र त्या वाहनाला चालकच नसल्याने अग्नीशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचू शकला नाही.
ज्या कापसाच्या गंजीला आग लागली, त्या गंजीजवळच सीसीआयने खरेदी केलेला पाच ते सहा हजार क्विंटल कापूस ताडपत्रीखाली झाकून होता, तर त्याच्या बाजुलाच ७० ते ८० कापसाच्या गठाणी पडून होत्या. आगीचे रौद्ररूप पाहून जिनिंगच्या परिसरात असलेली वाहने युद्धपातळीवर बाहेर काढण्यात आली. अगोदरच या जिनिंगच्या मार्गावर कापसाने भरलेल्या वाहनांची रांग लागून होती. त्यातच जिनिंग आवारातील वाहनेही तातडीने या मार्गावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार वैभव जाधव यांच्या सूचनेवरून डी.बी.पथक प्रमुख पीएसआय गोपाल जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.