शिक्षण विभागात लाखोंचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 10:22 PM2019-08-18T22:22:24+5:302019-08-18T22:24:15+5:30
पांढरकवडा नगरपरिषदेच्या शिक्षण विभागात लाखो रूपयांचा घोटाळा झाला आहे. पालिकेतील शिक्षण विभागाच्या लिपीकाने शिक्षकांच्या विविध खात्यातील १२ लाख ९३ हजारांची रक्कम चक्क आपल्या खात्यात परस्पर जमा केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : पांढरकवडा नगरपरिषदेच्या शिक्षण विभागात लाखो रूपयांचा घोटाळा झाला आहे. पालिकेतील शिक्षण विभागाच्या लिपीकाने शिक्षकांच्या विविध खात्यातील १२ लाख ९३ हजारांची रक्कम चक्क आपल्या खात्यात परस्पर जमा केली आहे.
नगरपरिषदेच्या शाळेतील शिक्षकांचे व सेवानिवृत्तांचे वेतनाचे अनुदान शिक्षक उपसंचालक कार्यालयाकडून पालिकेला प्राप्त होते. द महिन्यात वेतनाची रक्कम शिक्षकांच्या खात्यावर जमा केली जाते, तर शिक्षकांची इतर कपातीची रक्कम यामध्ये भविष्य निर्वाह निधी, विमा, पतसंस्था व इतर कपातीचा धनादेश उपसंचालक कार्यालयाकडून वेगळा प्राप्त होतो. हा धनादेश नगरपरिषदेच्या शिक्षण विभागातर्फे स्थानिक स्टेट बँकेच्या शाखेत जमा केला जातो व तेथून ती रक्कम परस्पर संबंधितांना वळती केली जाते. परंतु मार्च महिन्यापासून इतर कपातीची रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा न झाल्याची माहिती शिक्षकांना मिळाली.
यावेळी शिक्षकांनी अधिक चौकशी केली असता, शिक्षण विभागातील लिपीकाने घोटाळा केल्याचे लक्षात आले. मार्च ते जून या चार महिन्याची इतर कपातीची रक्कम १२ लाख ९३ हजार रूपये शिक्षण विभागातील लिपीकाने स्वत:च्या खात्यात जमा केल्याचे दिसून आले.
यावेळी वरिष्ठांच्या कानी ही बातमी पडताच प्रशासन अधिकारी व इतर पदाधिकाऱ्यांनी चेकबुक व व्हाऊचरची तपासणी केली असता, इतर कपातीची रक्कम शिक्षकांच्या खात्यावर जमा न होता लिपीकाच्या खात्यावर जमा झाल्याची बाब उघडकीस आली. आता या घोटाळ्याची चौकशी होऊन ही रक्कम शिक्षकांच्या संबंधित खात्यावर जमा होणार काय, घोटाळा करणाऱ्या लिपीकावर काय कारवाई होणार, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
घोटाळ्याची सखोल चौकशी करणार
पांढरकवडा नगरपरिषदेमध्ये शिक्षकांच्या वेतनातील घोटाळ्याबाबत मला आत्ताच माहिती मिळाली. मात्र याबाबत अजून तपशीलवार माहिती मिळाली नाही. या घोटाळ्याची सखोल चौकशी केली जाईल व त्यामध्ये दोषी असणाºयावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.