खाण सुरक्षा निदेशालयाच्या अधिकाऱ्यांनी केली खाण क्षेत्राची पाहणी, ग्रामस्थांनी डीजीएमएस अधिकाऱ्यांपुढे मांडल्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:47 AM2021-08-13T04:47:57+5:302021-08-13T04:47:57+5:30
वणी तालुक्यातील शिंदोला परिसरात पाच दशकांपासून सिमेंटसाठी कच्या मालाचे उत्खनन सुरू आहे. मात्र कंपनी नियमबाह्य कामे करून ग्रामस्थांना वेठीस ...
वणी तालुक्यातील शिंदोला परिसरात पाच दशकांपासून सिमेंटसाठी कच्या मालाचे उत्खनन सुरू आहे. मात्र कंपनी नियमबाह्य कामे करून ग्रामस्थांना वेठीस धरत असल्याचा आरोप आहे. सध्या कंपनीचे गोवारी गावालगत उत्खनन सुरू आहे. स्फोटामुळे घरांना तडे गेले आहे. स्फोट करताना दगड लागून रहिवाशांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेत वहिवाटीचे रस्ते बंद केल्यामुळे शेत मशागतीस अडचण येत आहे. याबाबत कंपनीकडे तक्रार केली. मात्र कंपनी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरूच होता. म्हणून संजय देरकर यांनी जून महिन्यात डीजीएमएस अधिकारी नागपूर यांच्याकडे निवेदन सादर करीत चौकशीची मागणी केली होती. मंगळवारी के.माधवराव यांनी भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली. भेटीदरम्यान गावाला लागून २.५७ मीटरवर उत्खनन केल्याचे दिसून आले. स्फोटामुळे सुधाकर पाचभाई, सुभाष उईके, सत्यवान किनाके, विमल वैद्य, अनिल उईके, अरविंद उईके, गजानन किनाके, कवडू गेडाम यांच्या घरांना तडे जाऊन नुकसान झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर लोकांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. शेतीलगत ४० मीटर उंच ढिगारे टाकण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र चौकशी दरम्यान ढिगाऱ्याची उंची ३५ मीटर असल्याचे स्पष्ट झाले. तपासणी दरम्यान आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याचे कंपनीला आदेश दिले. याप्रसंगी संजय देरकर, लुकेश्वर बोबडे, अजय कवरासे, अनिल उईके, संजय ठावरी, जयवंत देरकर, योगीराज आत्रामसह एसीसीचे मॅनेजर सुरेश वांढरे, कंचन कुमार, चौधरी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.