गौण खनिजाचे वारेमाप खनन
By admin | Published: April 7, 2017 02:27 AM2017-04-07T02:27:32+5:302017-04-07T02:27:32+5:30
तालुक्यात गत काही वर्षांपासून गौण खनिजाचे वारेमाप अवैध उत्खनन सुरू आहे. तालुक्यात ठिकठिकाणी गौण खनिजांचे खनन
पर्यावरणाला धोका : पुसद तालुक्यात ठिकठिकाणी मोठमोठ्ठाले खड्डे
पुसद : तालुक्यात गत काही वर्षांपासून गौण खनिजाचे वारेमाप अवैध उत्खनन सुरू आहे. तालुक्यात ठिकठिकाणी गौण खनिजांचे खनन केल्याचे पुरावे दिसत असून अनेक ठिकाणी मोठमोठ्ठाले खड्डे पडले आहेत. हा प्रकार खुलेआम सुरू असताना महसूल आणि पोलीस यंत्रणा मात्र कोणतीही कारवाई करीत नाही.
पुसद तालुक्यातील वन आणि महसूलच्या जमिनीवरून अवैध गौण खनिजाची लूट करण्याचा गोरखधंदा अनेकांनी सुरू केला आहे. तालुक्यात वाळू पट्ट्याचा लिलाव झालेला नसताना बेलोरा, पांढुर्णा, इसापूर, पुसद, हेगडी, हुडी, गायमुखनगर, गहुली, सावंगी या भागातून वाहणाऱ्या नद्यांतून मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा होत आहे. शहरात दहा ते पंधरा ट्रक क्षमतेपेक्षा अधिक वाळू घेवून येत आहे. परंतु महसूल विभाग त्यांच्यावर कारवाई करीत नाही.
वाळूसोबतच दगड आणि मुरूमाचीही तस्करी मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. मार्चअखेर सर्व खदाणी महसूल विभागाने बंद केल्या होत्या. यात ज्यांनी कर भरला त्यांच्या खदाणी सुरू करण्यात आल्या आहे. तालुक्यात खंडाळा शिवारात, सांडवा-मांडवा, गौळ, शिळोणा शिवारात शासकीय नियम पायदळी तुडवत गौण खनिजाचे उत्खनन करण्यात येत आहे. खंडाळा परिसरात वाशीमकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यापर्यंत खोदकाम केल्याचे दिसून येते. भविष्यात हा रस्ता खचल्यास नवल वाटू नये.
तालुक्यातील येलदरी, सावरगाव (बं), सांडवा, मांडवा, हर्षी, गौळ, शिळोणा, धुंदी, खंडाळा, सरकारी जमिनीवरील डोंगर जमीनदोस्त करण्यात येत आहे. तालुक्यातील अनेक शासकीय जागांवर मुरूम, मातीची चोरी सुरू आहे. या सर्व बाबींचा परिणाम प्रदूषणावर होत असला तरी महसूलचे मात्र दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)