आजपासून मिनी लाॅकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 05:00 AM2021-04-15T05:00:00+5:302021-04-15T05:00:02+5:30
नव्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. यामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये वर्गवारी केलेल्या सेवा आणि उपक्रम यांना कामकाजाच्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणाऱ्या तब्बल २७ सेवांना निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. या सेवा देताना काही बाबींचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणूचा वाढता विळखा पाहता राज्य शासनाने बुधवारी रात्री ८ वाजतापासून १ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी जाहीर केली आहे. या आदेशात अनेक अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. बाजारपेठ बंद व बाहेर फिरण्यावर निर्बंध अशा स्वरूपाची ही संचारबंदी असणार आहे. ब्रेक द चेन अंतर्गत यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.
नव्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही. यामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये वर्गवारी केलेल्या सेवा आणि उपक्रम यांना कामकाजाच्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणाऱ्या तब्बल २७ सेवांना निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. या सेवा देताना काही बाबींचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. ऑटोरिक्षामध्ये एक चालक दोन प्रवासी, चारचाकी वाहनात एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी तर एसटी बसमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करता येणार आहे. १४ प्रकारची सर्व कार्यालये, केंद्र व राज्य सरकारच्या आस्थापना सुरू ठेवण्यात येणार आहेत. यात बँकांसह विमा व औषधी उत्पादन, पतपुरवठा करणाऱ्या संस्थांचा समावेश आहे. रेस्टाॅरन्ट, बार आणि हाॅटेल्स पार्सल सुविधेच्या तत्त्वावर सुरू ठेवण्यास परवानगी आहे. रस्त्याच्या लगतच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत पार्सल सेवा देता येणार आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके वितरण सुरू
वर्तमानपत्र, मासिक, नियतकालिकांची छपाई व वितरणास मुभा देण्यात आली आहे. वर्तमानपत्र हे घरोघरी पोहोचविण्यासही सूट देण्यात आली आहे. वर्तमानपत्र वितरित करणाऱ्या सर्व व्यक्तींना पात्रतेनुसार लवकरात लवकर लस घेणे आवश्यक आहे.
शेतीविषयक कामे राहणार सुरळीत
शेतीची चालणारी कामे सुरू राहावी यासाठी बियाणे, खते, शेती उपकरणांची विक्री व दुरुस्ती सुरू ठेवली आहे. किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध डेअरी, खाद्य पदार्थ दुकाने, सार्वजनिक बसेस, सर्व वस्तूंची आयात-निर्यात सुरू राहणार आहे.
दुकाने, माॅल्स, सलून, धार्मिक स्थळे, शाळा बंद
पूर्वीचे निर्बंध आदेशातही कायम आहे. चित्रपटगृह, दुकाने, माॅल्स, शाॅपिंग सेंटर बंद ठेवण्यात येणार आहेत. धार्मिक स्थळेही बंद राहणार आहेत. सलूनची दुकाने, स्पा, ब्युटी पार्लर, शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत.
परीक्षा पर्यवेक्षकांना प्रमाणपत्राची सक्ती
परीक्षेकरिता नियुक्त असलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना लसीकरण आवश्यक आहे. ४८ तासाच्या आतील तपासणी पत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. कोणत्याही धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही. लग्नाला २५ व्यक्तींची मर्यादा.