खाणीला १२४ कोटींचा लाभ
By admin | Published: December 24, 2015 03:04 AM2015-12-24T03:04:49+5:302015-12-24T03:04:49+5:30
तालुक्यातील उकणी येथील वेकोलिच्या कोळसा खाणीला एका वर्षात तब्बल १२४ कोटींचा विक्रमी लाभ झाला आहे.
उकणी कोळसा खाण : वणी नॉर्थ एरियात रोल मॉडल बनली खाण
आसिफ शेख वणी
तालुक्यातील उकणी येथील वेकोलिच्या कोळसा खाणीला एका वर्षात तब्बल १२४ कोटींचा विक्रमी लाभ झाला आहे. ही खाण इतर खाणींसाठी आता आदर्श ठरली आहे.
उकणी कोळसा खाणीत आजपर्यंत एकही दुर्घटना घडली नाही. या खाणीचे काम वणी नॉर्थ एरियात प्रगतीपथावर आहे. खाणीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यामुळे खाणीने १२४ कोटींचा लाभ कमाविला आहे. या खाणीची स्थापना सन १९८२ मध्ये झाली. गेल्यावर्षी या खाणीने विक्रमी उत्पादन घेऊन खाणीचे नाव उंचावले होते. उकणी कोळसा खाणीत तब्बल २८.६ मीलीयन टन कोळसा असून सर्वात जास्त उत्पादन देणारी ही खाण आहे. या खाणीत एकूण ८०० कामगार कार्यरत आहे. याशिवाय एक हजार कामगार कंत्राटी पद्धतीने काम करतात. विशेष म्हणजे या खाणीत आत्तापर्यंत कोणतीच दुर्घटना घडली नाही. त्यासाठी कामगारांचे प्रयत्न कारणीभूत आहे. तसेच पाच कामगार युनियनही खाणीचे नाव उज्वल करण्यासाठी सहकार्य करतात. या खाणीला यावर्षी आठ लाख १७ हजार टन कोळसा काढण्याचे उद्दीष्ट होते. खाणीने उद्दीष्टापेक्षा तीन लाख ३५ हजार टन जादा कोळसा काढून एकूण ११ लाख ७० हजार टन कोळसा काढला आहे.
या खाणीला ओवर बर्डनचे उद्दीष्ट १८ लाख ७३ क्युब्येक मीटरचे होते. प्रत्यक्षात खाणीने २४ लाख क्युबेक मीटर ओ.बी.काढून पाच लाख ४५ हजार कुब्येक मीटरची वाढ केली. कंत्राटी पद्धतीने एक लाख १७ हजार जास्त ओ.बी.काढण्यात आली. या खाणीमधून चांगल्या प्रतिचा व गुणवत्तेचा कोळसा निघतो. गेल्यावर्षी खाणीने आठ लाख १२ हजार टन कोळसा रवाना करण्याचा निर्धार केला होता. प्रत्यक्षात खाणीने १२ लाख ८० हजार टन कोळसा ग्राहकांना वितरीत केला. गेल्यावर्षी नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी आठ लाख रूपयांनी ही खाण नफ्यात होती. यावर्षी खाणीने तब्बल १२४ कोटींचा लाभ करून गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३ कोटी ४२ लाखांची विक्रमी वाढ नोंदविली. या खाणीत सन २०१४ मध्ये अतिपावसाने मोठ्या प्रमाणात मातीचे भूस्खलन होण्याचे प्रकार घडले. त्यामुळे २०१५ मध्ये या खाणीचे उत्पादन काही काळ ठप्पसुद्धा पडले होते. मात्र कामगारांनी जीवाचे रान करून परिस्थितीवर मात केली.
परिसरात १२ लाख वृक्षांचे रोपण
या कोळसा खाण परिसरात आत्तापर्यंत तब्बल १२ लाख झाडे लावण्यात आली. ती पर्यावरणाचा समतोल राखत आहे. तब्बल ५५२ हेक्टरमध्ये ही झाडे जिवंत आहे. १८२ स्प्रिंक्लर व सहा टँकरद्वारे त्यांना पाणी देण्यात येते. परिसरात मोठ्या प्रमाणात आरोग्य व इतर सुविधा पुरविण्यात येत आहे. इतर कोळसा खाणींपेक्षा उकणी कोळसा खाण उत्पन्न काढण्यात पुढे आहे. मात्र खाणीची जागा लहान असल्यामुळे उत्पन्न कमी होत आहे. पुन्हा जागा मिळाल्यास जगात ही खाण प्रगतीपथावर राहिल, असे मत वेकोलिचे महाप्रबंधक डी.एम.गोखले यांनी व्यक्त केले. वणी नॉर्थ एरियात कोलार-पिंपरी, घोन्सा, जुनाडा, भांदेवाडा, पिंंपळगाव खाणी येतात. मात्र त्यातून केवळ ३० टक्केच उत्पादन मिळते. एकट्या उकणी कोळसा खाणीतून तब्बल ७० टक्के उत्पादन घेतले जाते.