गृह राज्यमंत्री, महानिरीक्षक उमरखेडमध्ये तळ ठोकून
By admin | Published: September 18, 2016 01:19 AM2016-09-18T01:19:37+5:302016-09-18T01:19:37+5:30
गणेश विसर्जन मिरवणुकीवर विशिष्ट समाजाने अचानक दगडफेक केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री
जनजीवन पूर्वपदावर : दगडफेक करणाऱ्यां संशयितांची धरपकड सुरूच
उमरखेड : गणेश विसर्जन मिरवणुकीवर विशिष्ट समाजाने अचानक दगडफेक केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील आणि विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव दोन दिवसांपासून उमरखेडमध्ये तळ ठोकून आहेत.
गुरुवारी सायंकाळी ताजपुरा मार्गावर छावा गणेश मंडळाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यात पाच पोलिसांसह १६ जण जखमी झाले. पोलिसांना हवेत गोळीबार करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे लागले होते. ही घटना माहीत होताच पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, राज्य गुप्त वार्ता विभागाच्या नागपूर येथील उपायुक्त अनिता पाटील, अमरावतीचे सहायक उपायुक्त राजेश भुयार आदींनी उमरखेडमध्ये धाव घेतली. ही मंडळी दोन-तीन दिवसांपासून उमरखेडमध्येच तळ ठोकून आहे. गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील हेसुद्धा शुक्रवारी रात्रीच उमरखेडमध्ये दाखल झाले आहे. त्यांनीसुद्धा सर्व संबंधितांच्या भेटी घेवून शांततेचे आवाहन केले. शनिवारीही ना.पाटील यांनी शहरात काही ठिकाणी भेटी देवून शांततेचे आवाहन केले. विश्रामगृहावर त्यांनी पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी यांची आमदार राजेंद्र नजरधने यांच्या उपस्थितीत बैठक घेवून स्थितीचा आढावा घेतला. त्यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशीही चर्चा केली. यावेळी काही पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, दगडफेक करणाऱ्यांची धरपकड सुरूच आहे. पोलिसांनी आतापर्यंत ४० जणांना अटक केली आहे. शनिवारी उमरखेडमधील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. बाजारपेठ तसेच शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहे. उमरखेड शहरात तणावपूर्ण शांतता असून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिक्षेत्रातील चार-पाच जिल्ह्यातून पोलीस कुमक बोलविण्यात आली आहे.
(शहर प्रतिनिधी)