महसूल राज्यमंत्री राठोड राजीनाम्यासाठी सज्ज
By admin | Published: February 10, 2017 01:47 AM2017-02-10T01:47:35+5:302017-02-10T01:47:35+5:30
महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री, शिवसेना नेते संजय राठोड हे आपल्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यासाठी सज्ज आहेत.
‘मातोश्री’वरून आदेश : शिवसेना-भाजपातील संबंध ताणले
राजेश निस्ताने यवतमाळ
महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री, शिवसेना नेते संजय राठोड हे आपल्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यासाठी सज्ज आहेत. कारण ‘मातोश्री’वरून ना. राठोडसह शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना तसे आदेश प्राप्त झाले आहे.
राज्यात शिवसेना-भाजपाच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहे. परंतु मुंबई महापालिकेतील निवडणुकीत युती करण्यावरून या दोनही पक्षातील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच दोनही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर शाब्दीक वार केल्याने हे संबंध तुटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी सरकारचा पाठिंबा काढण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. सोबतच ‘मातोश्री’वरून शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना राजीनामा देण्याच्या तयारीत रहा, असे आदेश जारी करण्यात आले. या पार्श्वभूमीवर येथील शिवसेना नेते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही ‘मातोश्री’वरील या आदेशाला अधिकृत दुजोरा दिला आहे.
ना. रावतेंचा राजीनामा खिशातच
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनीसुद्धा वृत्तवाहिन्यांशी बोलताना शिवसेनेचे मंत्री राजीनामा देण्यास तयार असल्याचे सांगताना आपण हा राजीनामा खिशात घेऊन फिरत असल्याचेही माध्यमांना सांगितले. शिवाय राजीनामाही खिशातून काढून दाखविला.
भाजपा व शिवसेनेतील संबंध केवळ मुंबई स्तरावरच ताणले गेलेले नसून त्याचे पडसाद राज्यभर पहायला मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातही भाजपा-सेनेचे कार्यकर्तेच नव्हे तर खुद्द प्रमुख नेतेसुद्धा आमने-सामने आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने भाजपाला आडवे करण्याची जाहीर घोषणाच केली आहे. त्या दृष्टीने शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू आहे. शक्य असेल तेथे शिवसेनेचा विजय आणि जेथे विजयाची शक्यता नसेल तेथे भाजपाचा पराभव हेच सेनेचे या निवडणुकीतील मुख्य उद्दीष्ट आहे. भाजपाचा पराभव करताना काँग्रेस निवडून येणार की राष्ट्रवादी याचीही तमा शिवसैनिक बाळगत नसल्याचे चित्र आहे.
पालकमंत्रीपदावरून बिनसले
मुळात यवतमाळ जिल्ह्यात भाजपा व शिवसेनेतील संबंध ताणले जाण्यामागे पालकमंत्री पदाचा वाद कारणीभूत ठरला आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे संजय राठोड हे एकमेव आमदार आहेत आणि त्यांच्याकडे गेली दीड वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्रीपद होते. ना. राठोड हे विदर्भातील शिवसेनेचे एकमेव मंत्री आहेत. जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपाचे असताना पालकमंत्रीपद भाजपाला का नाही असा सवाल या आमदारांकडून वारंवार मुख्यमंत्र्यांना विचारला जात होता. अलिकडेच मंत्रीमंडळ विस्तारात यवतमाळचे भाजपाचे आमदार मदन येरावार यांची वर्णी लागली. सार्वजनिक बांधकाम, सामान्य प्रशासन, ऊर्जा या सारख्या दमदार खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली गेली. मंत्रीपद मिळाल्यापासूनच भाजपाने यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही भाजपालाच मिळावे, यासाठी फिल्डींग लावली होती. अखेर त्यात २९ डिसेंबर २०१६ रोजी भाजपाला यश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील कळंब येथे कार्यक्रमासाठी आले होते. येथून मुंबईत जाताच त्यांनी पालकमंत्री बदलविले. त्यात शिवसेनेच्या संजय राठोड यांच्याकडील पालकमंत्रीपद काढून घेऊन ते ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्याकडे सोपविले गेले. ना. राठोड यांच्याकडे भौगोलिक दृष्ट्या अगदीच लहान असलेल्या वाशिम जिल्ह्याची जबाबदारी सोपविली गेली. मात्र ना. राठोड यांना यवतमाळचे तर ना. येरावार यांना वाशिमचे सहपालकमंत्री बनवून मुख्यमंत्र्यांनी युतीतील ‘कनेक्टीव्हीटी’ कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.
...तर मंत्रीपद ठरणार अल्पावधीचे
भाजपा-सेनेतील या वादात ना. संजय राठोड यांना मात्र अवघ्या दोन वर्षातच मंत्रीपद सोडण्याची वेळ आली आहे. शिवसेनेने पाठिंबा काढल्यास व राज्यातील सरकार गडगडल्यास येथील ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्यावर तर अवघ्या सहा महिन्यातच मंत्रीपद सोडण्याची वेळ येणार आहे.
शिवसैनिक पाहतात भाजपाला पाण्यात
पालकमंत्रीपद काढून घेतल्याचा वार शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला. तेव्हापासून शिवसैनिक भाजपाला पाण्यात पाहू लागले आहे. त्यातच जिल्हा परिषद व १६ पंचायत समित्यांच्या निवडणुका होत असल्याने भाजपाला आपली जागा दाखवून देण्यासाठी शिवसेना नेते व कार्यकर्ते जीवाचे रान करताना दिसत आहेत.