जलयुक्तच्या कामांना मंत्र्यांची भेट
By admin | Published: May 6, 2017 12:13 AM2017-05-06T00:13:17+5:302017-05-06T00:13:17+5:30
राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी तालुक्यातील तीन गावांना भेट देऊन तेथील जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणी केली.
राम शिंदे : दारव्हा परिसरातील विविध कामांची पाहणी व सूचना
तालुका प्रतिनिधी।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी तालुक्यातील तीन गावांना भेट देऊन तेथील जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणी केली. लाख (खिंड) येथे सुरू असलेल्या तलावातील गाळ काढण्याच्या कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
ना. शिंदे शुक्रवारी सकाळी ६ वाजता भोपापूर येथे पोहोचले. त्यांच्या समवेत विभागीय कृषी सहसंचालक सु.रा. सरदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तालुका कृषी अधिकारी भारणे, नायब तहसील विनोद हरणे आदी उपस्थित होते. भोपापूर येथील सिंचन बंधाऱ्याच्या पाहणीनंतर लाख (खिंड) येथे भेट दिली. त्या गावात असलेल्या तलावातील गाळ काढण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात लोकसहभाग लाभला आहे. निरंजन चौधरी यांच्यासह गावकरी व इतर लोक मेहनत घेत आहेत. २०० च्यावर ट्रॅक्टर या कामावर आहेत. दारव्हा येथील विश्रामगृहावर आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर हातगावला जाऊन तेथील नाला खोलीकरणाच्या कामाला भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांकडे जातीने लक्ष घालून सर्व कामे दर्जेदार व्हायला पाहिजे, अशा
सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.