‘मीरा-कबीरा’ने नवरात्रोत्सवाला सुरुवात
By admin | Published: October 16, 2015 02:17 AM2015-10-16T02:17:44+5:302015-10-16T02:17:44+5:30
येथील जैताई मंदिराच्या सभागृहात मंगळवारी रात्री ‘मीरा-कबीरा’ या भक्ती गीतांच्या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली.
वणी : येथील जैताई मंदिराच्या सभागृहात मंगळवारी रात्री ‘मीरा-कबीरा’ या भक्ती गीतांच्या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली.
शास्त्रीय गायीका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या शिष्या रेणुका इंदूरकर यांनी ‘मै तो सावर गाना, करम की गती न्यारी, ओ म्हारा गिरीधारी, मारत मोरे नैनन मे पिचकारी, म्हाशे मन हिरजीसू जोडयो’, अशा मिराबार्इंच्या एकापेक्षा एक सरस रचना सादर केल्या. त्यानंतर ‘साहेब है रंगरेज, अवधू मेरा मन मतवारा, सुनता है गुरूग्यानी, एक दुई होई तो उन्हे समझाऊ’, अशा कबीरदासांच्या रचना गाऊन उपस्थितांना स्वरचिंब केले.
संदीप गुरनुलेची संवादिनी साथ, मोहन कुर्वेंचा तबला, आदित्य गोगटे यांच्या बासरीने कार्यक्रमाची सुरम्यता वृद्धिंगत केली. आसावारी किशोर गलांडे हिचे निवेदन कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. प्रास्ताविक मंडळाचे सचिव माधव सरपटवार यांनी केले. अंजली भागवत, गुलाब खुसपुरे, नामदेव पारखी, विनय कोंडावार यांनी कलाकारांचे स्वागत केले. चंद्रकांत अणे यांनी आभार मानले. यावेळी राज्य नृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेती आस्था दहेकर, देवस्थानचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला, पदाधिकारी, सदस्य व वणीकर उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)