‘डीएचओं’वर विनयभंगाचे गुन्हे

By admin | Published: July 20, 2016 01:46 AM2016-07-20T01:46:23+5:302016-07-20T01:46:23+5:30

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड. राठोड यांच्याविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचे दोन वेगवेगळे

Misconduct Crime on 'DHOs' | ‘डीएचओं’वर विनयभंगाचे गुन्हे

‘डीएचओं’वर विनयभंगाचे गुन्हे

Next

दोन एफआयआर : एकट्यात घरी बोलावत असल्याचा आरोप
यवतमाळ : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड. राठोड यांच्याविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचे दोन वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यातील एक तक्रार ही डॉक्टरची तर दुसरी परिचारिकेची आहे. याशिवाय आणखी सहा महिलांच्या तक्रारीची पोलीस चौकशी करीत आहे. थेट डीएचओवर गुन्हा दाखल झाल्याने जिल्हा परिषद व आरोग्य यंत्रणेत खळबळ निर्माण झाली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी घरी एकट्यात भेटण्यास बोलावितात, शरीरसुखाची मागणी करतात, एका परिचारिकेचा हात धरुन विनयभंग केला, अशी तक्रार घेऊन सोमवारी काही महिला डॉक्टर आणि परिचारिका शहर ठाण्यात धडकल्या होत्या. सुरुवातीला विशाखा समितीचे कारण पुढे करण्यात आले. मात्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतल्यानंतर दोन महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. नेर तालुक्यातील महिला डॉक्टरने वाढीव भत्त्यासाठी डॉ. राठोड यांच्याकडे तब्बल १२ अर्ज दिले. मात्र दखल घेतली नाही. उलट नेर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या माध्यमातून निरोप पाठवून एकट्यात भेटण्याचे सांगितले.
सदर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने असा निरोप देण्यास डीएचओंना नकार दिला. त्यानंतर वाढीव भत्त्यासाठी महिला डॉक्टरने डीएचओंना फोन केला. तेव्हा प्रत्यक्ष भेटायला या असे सांगितले. वाढीव भत्त्याच्या बदल्यात अप्रत्यक्ष शरीरसुखाची मागणी केली जात असल्याची तक्रार सदर महिला डॉक्टरने केली आहे. तर वणी तालुक्यातील कंत्राटी परिचारिकेला डीएचओंनी कोल्हे ले-आऊटमधील घरी भेटायला येण्याचा प्रस्ताव दिल्याचा आरोप आहे. सदर परिचारिका २९ जून रोजी डीएचओंना भेटण्यासाठी गेली असता त्यांनी हात धरला. डीएचओंचे वर्तुणूक लक्षात येताच सदर परिचारिकेने तेथून पळ काढला.
यानंतर ३० जूनला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला कामावरून काढून टाकल्याचे तक्रारीत सदर परिचारिकेने म्हटले आहे. यासह इतर दोन महिला डॉक्टर आणि चार कंत्राटी परिचारिकांनी तक्रार दिली. मात्र पोलिसांनी दोनच तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
डॉ.के.झेड. राठोड यांच्या विरोधात विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल केले आहे. उर्वरित तक्रारींची तपासणी करून गुन्हा नोंदविण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शुभांगी गुल्हाने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कॉल डिटेल्सवर तपास केंद्रीत केला असून तक्रारीची पडताळणी केली जात आहे. त्यानंतरच अटकेची कारवाई करणार असल्याचे ठाणेदार नंदकुमार पंत यांनी सांगितले. जिल्हा परिषदेसह आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

अटकेसाठी दिला ४८ तासांचा अल्टिमेटम
४वादग्रस्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के.झेड़ राठोड यांच्या विरोधात दिलेल्या सर्वच तक्रारीवरून गुन्हा दाखल करावा, पोलिसांनी त्यांना ४८ तासात अटक करावी, अन्यथा जिल्ह्यातील सर्वच वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी कायमस्वरूपी कामबंद आंदोलन पुकारेल असा, इशारा वैद्यकीय अधिकारी संघटना, नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना, औषध निर्माण अधिकारी संघटना, हिवताप कर्मचारी संघटनेने एका पत्रपरिषद दिला आहे. यावेळी संघटनेचे अशोक जयसिंगपुरे, डॉ. किशोर कोषटवार, डॉ. महेश मनवर, डॉ. दिपक आनलदास, डॉ. राहुल वाघमारे, वाय.एम.सैय्यद, धनंजय मेश्राम, जगदीश शुक्ला, केवल पाटील, पुरूषोत्तम शेणमारे आदी उपस्थित होते.

Web Title: Misconduct Crime on 'DHOs'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.