नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गैरसमज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 07:13 PM2019-12-16T19:13:53+5:302019-12-16T19:14:13+5:30
नागरिकत्व कायद्यामुळे स्थानिक मुस्लीमांना कोणताही धोका नाही किंवा हा कायदा घटनाबाह्य नसल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत मांडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहे. काँग्रेसकडून चिथावणी देत आंदोलन घडवून आणले जात आहे. या विधेयकात कुणावरही अन्याय होणार नाही, केवळ बाहेरच्यांना नागरिकत्व देण्याची तरतूद केल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
नागरिकत्व कायद्यामुळे स्थानिक मुस्लीमांना कोणताही धोका नाही किंवा हा कायदा घटनाबाह्य नसल्याचा दावा त्यांनी केला. मोदी सरकारने घेतलेले निर्णय देशहिताचेच आहे. जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा कमी केला. तेथील ३७० कलम काढून जम्मू काश्मिर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. तेथील तणाव कमी झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जाचा दिला जावा, अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याचे ना. आठवले यांनी सांगितले.
दलित व आदिवासींनी कुठलाही संभ्रम मनात ठेऊ नये, कुणाचेही आरक्षण काढले जाणार नाही, सबका साथ-सबका विकास याच धोरणावर केंद्रातील सरकार काम करीत आहे. आर्थिक मंदीही जागतिक स्तरावरच आहे. या मंदीच्या काळात बाहेर पडण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार बनायला हवे होते. मात्र महाविकास आघाडीचे सरकार बनले, ते ५० दिवस टिकते की नाही, अशी चिन्हे दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे राहूल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत अतिरेकी भूमिका मांडली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशभक्त होते. त्यांनी देशासाठी कारावास भोगला. आता याच मुद्यावर काँग्रेस व शिवसेनेत जुंपली आहे. काँग्रेसने शिवसेनेचा पाठिंबा काढावा आणि भाजप-सेनेचे सरकार महाराष्ट्रात स्थापन व्हावे, अशी अपेक्षा रिपब्लिक पार्टीला असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.
रिपब्लिकन पक्ष हाच बाबासाहेबांचा पक्ष आहे. आता हा पक्ष देशपातळीवर वाढत असल्याचेही ना. आठवले यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर, आर.एस. वानखडे, गोविंद मेश्राम, प्रदीप दंदे, चंद्रकांत पाटील, बाळू घरडे, प्रभाकर जीवने, नवनीत महाजन, गौतम चव्हाण, सुधाकर तायडे, धर्मराज गायकवाड, सुखदेवराव जाधव आदी उपस्थित होते.